मोठी बातमी : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे राहणार दोन तास बंद !
दै. बातमीदार । २४ जुलै २०२३ । राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक महामार्गाशेजारील दरड कोसळल्याचे प्रमाण वाढले असून मध्यरात्री पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी दरड कोसळली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या तिन्ही लेन बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पहाटे अडीचपर्यंत दरड हटविण्यात आली होती. त्यानंतर दोन लेन सुरू करण्यात आल्या होत्या. तर एक लेन अजुनही बंद आहे. मात्र आता दुपारी दोन तास मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुपारी १२ ते २ या वेळी महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत रस्त्यावरील दरड हटविण्यात येणार आहे. दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाला लागल्या होत्या. आता दोन लेन सुरू असल्या तरी मोठ्या प्रमाणात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांची अडचण झाली आहे. त्यात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नोकरदार वर्गाची पंचाईत झाली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम