मोठी बातमी : कर्नाटक विरोधातील सीमावादाचा ठराव एकमताने मंजूर !
दै. बातमीदार । २७ डिसेंबर २०२२ । नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातल्या ८६५ गावात महात्मा फुले जनआरोग्य, सारथी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, मुख्यमंत्री सहाय्यता निधी या योजना लागू करण्याची घोषणा मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सीमावर्ती भागातल्या जत तालुक्यातल्या 48 गावांत म्हैसाळ विस्तारीकरणाचा 2 हजार कोटींच्या प्रकल्पाला मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले. कर्नाटक विरोधातील सीमावादाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी साऱ्यांचे आभार मानले.
सीमावादाचा ठराव एकमताने मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार मानायला उठले. ते म्हणाले, भुजबळ साहेब हा 60-65 वर्षांचा विषय आहे. तुम्ही आणि मी साक्षीदार आहोत. यावर अनेक ठराव देखील केले. त्यात यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्या काळात त्यांनी देखील ठराव केला. त्यावेळस केंद्र, राज्य, कर्नाटकात काँग्रेस सरकार होते. मी वस्तुस्थिती सांगतोय. पृथ्वीराज बाबा म्हणाले दोन्ही मुख्यमंत्र्यांना एकत्र ठेवावे. एकनाथ शिंदे इतके बोलताच विरोधकांनी जोरदार गोंधळाला सुरुवात केली. काँग्रेसचे सरकार असताना हा प्रश्न का सोडवला नाही, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे करतील किंवा त्यावरून काही बोलतील हे ध्यानात घेऊन गोंधळ सुरू झाला.
विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बराच वेळ बोलू दिले नाही. हे पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मदतीला धावले. फडणवीस म्हणाले, सन्माननीय मुख्यमंत्री धन्यवाद देतायत. काय-काय करणार आहोत, हेच पटलावर आणतोय. कोणावरही टीका होत नाही. आपल्या योजना काय आहेत ते सांगतायत. त्याबद्दल एवढं वाईट वाटण्याचं काय? असा सवाल करत विरोधकांना शांत राहण्याचे आवाहन केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम