बळीराजाला मोठा दिलासा : राज्यात पावसाचे जोरदार आगमन !
बातमीदार| २ सप्टेंबर २०२३ | राज्यात गेल्या महिन्याभरापासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार आगमन केल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य फुलणार आहे. आज पुण्यासह पिंपरी चिंचवड व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवार रात्रीपासून दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे पिके करपण्याच्या चिंतेने व्याकूळ झालेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
गत महिन्याभरापासून पावसाने मोठा ब्रेक घेतला. यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर शुक्रवारी रात्री पुण्याच्या बिबवेवाडी, कोथरूड, पेठ परिसर, एनआयबीएम, शिवाजीनगर, हडपसर आदी भागात मुसळधार पाऊस झाला. याशिवाय पुणे ग्रामीणमधील पिंपरी चिंचवडमधील मोशी व मावळ तालुक्यातही जोरधारा कोसळल्या. शनिवारी सकाळी 9.05 वाजेपर्यंत शिवारीजनगरात 19 मिमी पावसाची नोंद झाली. तर चिंचवडमध्ये 83.5 मिलिमीटर, मगरपट्ट्यात 54 एमएम, लोहेगावात 31.8 मिमी व पाषाणमध्ये 12.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुण्याच्या लोणावळण्यातही पावसाने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारी मध्यरात्री इथे पावसाने चांगली कृपादृष्टी दाखवली. या ठिकाणी सुमारे 100 मिलिमीटर पाऊस झाला. या भागातील प्रत्येकाला गत 3 आठवड्यांपासून पावसाची प्रतिक्षा होती. आता ताज्या पावसामुळे पुन्हा एकदा पर्यटकांचे पाय येथील वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी वळतील व त्यामुळे येथील व्यवसाय रुळावर येतील असा अंदाज आहे. गतवर्षीच्या तुलनेत येथे तब्बल 777 मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी या भागात 4583 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. पण यंदा मात्र येथे केवळ 3806 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम