भाजप संतप्त ; महिला आमदारांला ढकलणे शिंदे गटाला भोवणार ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ मे २०२३ ।  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप एकत्र जरी सत्तेत असले तरी राज्यातील शिंदे गटातील मंत्री व नेत्यामध्ये सुरु असलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. नाशिक येथे निमा पॉवर प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी मिंधे गटाने भाजप आमदार सीमा हिरे यांना अक्षरशः ढकलले. त्यामुळे त्या पडल्या आणि त्यांचा पाय मुरगळला. मात्र पालकमंत्री दादा भुसे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांची साधी विचारपूसही केली नाही. संतापलेल्या आमदार हिरे तेथून निघून गेल्या. सामंत आणि भुसे यांनी हसतखेळत उद्घाटन उरकले. त्यामुळे भाजप प्रचंड संतापला असून भाजपामुळेच तुम्ही मंत्री आहात याची आठवण ठेवा, अशा शब्दांत भाजपने भुसे-सामंतांना सुनावले आहे.

नाशिक इंडस्ट्रीज ऍण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) तर्फे नाशिक सातपूर येथील आयटीआय मैदानावर शुक्रवारपासून निमा पॉवर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमावेळी चमकोगिरी करण्याच्या स्पर्धेत लोटालाटी झाली. निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे हे फोटोत येण्यासाठी पुढे सरसावत असताना त्यांचा जोरदार धक्का भाजप आमदार सीमा हिरे यांना लागला. यामुळे त्या जमिनीवर कोसळल्या. इतरांच्या मदतीने त्या कशाबशा उभ्या राहिल्या. आपल्या धक्क्यामुळे सीमाताई पडल्याने त्यांची माफी मागण्याची तसदी बेळे यांनी घेतली नाहीच. त्याउलट त्यांच्याकडे पद्धतशीर दुर्लक्ष करीत ते फीत कापण्यासाठी मंत्र्यांजवळ जाऊन उभे राहिले. या दोन्ही मंत्र्यांनीही या घटनेकडे दुर्लक्ष केले. सीमाताईंची साधी विचारपूस करण्याचेही सौजन्य दाखविले नाही. हा अपमान सहन न झाल्याने, पाय मुरगळलेला असतानाही तेथे न थांबता नाराज आमदार सीमा हिरे या कार्यक्रमस्थळावरून निघून गेल्या. दोन्ही मंत्र्यांनी, मिंधे गट व निमाच्या पदाधिकाऱयांनी मोठय़ा उत्साहात प्रदर्शन उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून घेतला.

या घटनेची भाजपात व्हायची ती गंभीर चर्चा झाली. मिंधे गटाकडून अपमान सहन करायचा नाही, खडसावून टाकायचे, असे ठरले. वरिष्ठांपर्यंत घटनाक्रम कळविण्यात आला. योग्य ती दखल घेऊन प्रतिक्रिया देण्यात आली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांना आठवण करून देतो की, त्यांची पदं ही भारतीय जनता पक्षामुळे आहेत, असा थेट इशाराच भाजपचे सह मुख्य प्रवक्ता अजित चव्हाण यांनी या दोन्ही मंत्र्यांना दिला. तशी फेसबुक पोस्टच त्यांनी शेअर केली. संवेदनाहीन, संस्कारहीन वागणूक नाशिककरांना दिसली. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील घसरणारा स्तर पाहून वाईट वाटते. पक्षाचा सह मुख्य प्रवक्ता म्हणून या प्रकाराची गंभीर दखल घेऊन मी यांचा निषेध करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत ही नाराजी पोहचविली जाईल, असेही चव्हाण यांनी फेसबुक पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. या घटनेला जबाबदार असणारे धनंजय बेळे हे संस्कारहीन व मिरवून घेण्याची हौस असणारी व्यक्ती आहे. नाशिककरांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम