लोकसभेसाठी भाजपने आखला मोठा प्लान !
दै. बातमीदार । ८ जून २०२३ । देशातील कर्नाटक निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्याने आता भाजप आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोठा प्लान आखण्यास तयार झाली आहे. त्यामुळे संघटनेत मोठे बदल करण्याची तयारी देखील सुरु केली असून याअंतर्गत अनेक राज्यांमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाऊ शकतात. तसेच, स्थानिक पातळ्यांवरही बदल केले जातील. याशिवाय काही नेत्यांना नव्या जबाबदाऱ्याही दिल्या जाऊ शकतात. पक्षांतर्गत चर्चा आहे की, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे अनेक पदाधिकारी आहेत, मात्र त्यांना निवडणूक लढविण्याचा व लढण्याचा फारसा अनुभव नाही. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गुजरातमधील बड्या नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, पक्ष यूपी आणि महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यांमध्ये 2019 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभेच्या 128 जागा या दोन राज्यांतूनच येतात. उत्तर प्रदेशात 80 जागा आहेत, यानंतर महाराष्ट्राने 48 खासदार दिल्लीला पाठवले आहेत. यूपीमध्ये भाजप पक्षाची स्थिती मजबूत मानून चालत आहे. यानंतरही 9 जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे, जेथे ते आधी जिंकू शकले नव्हते.
भाजप महाराष्ट्राच्या बाबतीत अधिक चिंतित आहे. कारण येथे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस एकत्रित आहेत. हे तिन्ही एकत्र आले, तर एक मास बेस तयार होतो. सामाजिक समीकरणही अशा पद्धतीने तयार झाले असून, यामुळे भाजपचा ताण वाढणार आहे. तिन्ही पक्ष एकत्रित आल्याने भाजपचे विदर्भ, मराठवाड्यापासून ते मुंबईपर्यंतचे टेन्शन वाढले आहे. एकनाथ शिंदे गटाकडून भाजपला आशा आहे. मात्र यातही, भाजप स्वतः किती जागांवर निवडणूक लढवते आणि शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) कुठे संधी देते, हे पाहावे लागले.
सोमवारी आणि मंगळवारी अमित शहा, जेपी नड्डा आणि भाजपचे संघटन सरचिटणीस बीएल संतोष यांची बैठक झाली. या बैठकीत, संघटनेतील फेरबदलासंदर्भातही चर्चा झाली. प्रामुख्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कुणाकडे कोणती जबाबदारी द्यावी यासंदर्भातही चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे, भाजपने यापूर्वीच विनोद तावडे, सुनील बंसल आणि तरुण चुग यांच्याकडे काही अशा जागांची जबाबदारी दिली आहे, जेथे पक्ष कमकुवत आहे. हे तिन्ही नेते अमित शाह यांच्या विश्वासातील आहेत. सूत्रांच्यामते, भाजपने देशभरातील अशा एकूण 160 जागा निवडल्या आहेत. ज्यांवर भाजप अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम