
भाजपचा आक्रमक पवित्रा; नामांकित शिक्षणसंस्थेत ध्वज जाळला
दै. बातमीदार । ३० सप्टेंबर २०२२ । वादग्रस्त संघटना “पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया” (पीएफआय) वर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणी याचे पडसाद उमटत आहे. अशातच पुणे येथे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करतांना “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा दिल्याचा आरोप केला जात आहे.
“जर लोक अशा प्रकारच्या घोषणा देत असतील, तर आपल्या देशातील नामवंत शिक्षण संस्थांमध्ये पाकिस्तानचा ध्वज कशाला हवा? असा प्रश्न उपस्थित करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील कोथरूड येथील विश्वविद्यालय म्हणून घोषित केलेल्या एमआयटी एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधील ४८ ध्वजांपैकी पाकिस्तानचा झेंडा जाळला आहे.
दरम्यान, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्रीय गृहमंत्रालयाने ५ वर्षांची बंदी घातली असून, या संघटनेवर दहशतवादास, देशविघातक कृत्यांना प्रोत्साहन देणे व दहशतवादासाठी विदेशातून निधी संकलन करण्यासारखे विविध आरोप लावले गेले आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम