
बॉलिवूडमधील ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक खुराना यांचे निधन
दै. बातमीदार । २८ ऑक्टोबर २०२२ । बॉलिवूडमधील ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक शिव कुमार खुराना यांनी वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईमधील ब्रह्मकुमारी ग्लोबल रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
शिव कुमार खुराना यांनी तब्बल 35 वर्ष चित्रपटसृष्टीत काम केले. अशोक कुमार, संजीव कुमार, फिरोज खान, शेख मुखतियार, हेलन, जॉय मुखर्जी, विनोद मेहरा, जरीना वहाब, कमाल सदना ते कादर खान, सदाशिव अमरापूरकर, रझा मुराद आणि अनुपम खेर अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. अभिनेते विनोद खन्ना यांना सर्वप्रथम नायकाची भूमिका साकारण्याची संधी शिव कुमार खुराना यांनी आपल्या चित्रपटात दिली होती. सुनील दत्त यांच्या होम प्रोडक्शनद्वारे निर्मित ‘मन का मीत’ या चित्रपटातून विनोद खन्ना यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात खन्ना यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर विनोद खन्ना यांना केवळ खलनायकाच्या भूमिकेसाठीच विचारले जायचे. पण विनोद खन्ना यांना शिव कुमार खुराना यांनी हीरो म्हणून जगासमोर आणले. 1971 मध्ये रिलीज झालेला ‘हम तुम और वो’ हा तो चित्रपट होय. एवढेच नव्हे तर विंदू दारा सिंह यांनाही खुराना यांनीच मनोरंजनविश्वात आणले.
मिट्टी और सोना, ‘फर्स्ट लव लेटर’, ‘बदनाम’, ‘बदनसीब’, ‘बे आबरू’, ‘सोने की जंजीर’ आणि ‘इंतकाम की आग’ या चित्रपटांचे दिग्दर्शन शिव कुमार खुराना यांनी केले होते. तर ‘हम तुम और वो’, ‘दगाबाज’ आणि ‘अंग से अंग लगाले’ या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. शिव कुमार खुराना यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम