
पारोळा – गिरणा पाटबंधारे विभाग पाटबंधारे उपविभाग जळगांव अंतर्गत येणाऱ्या पारोळा तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्प तामसवाडी पुर्ण क्षमतेने भरल्याने आमदार अमोल पाटील यांच्या शुभहस्ते विधीवत पुजा करून जलपुजन करण्यात आले.
याप्रसंगी जि.प.मा.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, देवगांव सरपंच समिर पाटील, पाटबंधारे उपविभाग जळगाव सहाय्यक अभियंता श्रेणी ०१ सिद्धार्थ पाटील, पाटबंधारे उपविभाग भडगाव उपविभागीय अभियंता सुभाष चव्हाण, तामसवाडी शाखा अधिकारी प्रीतम काकडे यांचेसह पंचक्रोशितील ग्रामपंचायत, विकासो व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवसेना, युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, बोरी प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बोरी मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ४०.३१ द.ल.घ.मी. असून त्यापासून उजवा डावा कालवा २१ कि.मी., डावा कालवा ९ कि.मी. व त्यावरील वितरण प्रणाली व्दारे लाभक्षेत्रातील एकूण २६ गावांना ४५५३ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होतो. तसेच बोरी प्रकल्पातून पारोळा नगरपालिका, तामसवाडी व ४ गावे, बोळे व ६ गावे, यासह ढोली, करमाड, वेल्हाणे या एकूण ८ गावांना बिगरसिंचन योजनेचा लाभ मिळतो. हे धरण पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे पारोळा तालुक्यातील सिंचन व पिण्याचा पाण्यासाठी मोठा फायदा होतो. त्यामुळे धरण पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे सिंचनासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागला आहे. बोरी धरण दरवर्षी असेच भरावे आणि परिसरातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा, अशी मनोकामना व्यक्त केली. परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी ठिबक सिंचनाद्वारे, काटकसरीने आणि मोजकेच पाणी वापरून पाण्याची बचत करावी, असे आवाहन आमदार अमोल पाटील यांनी यावेळी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम