जळगाव एमआयडीसीत कारचोरीचा गुन्हा उघड; आरोपी अटकेत

बातमी शेअर करा...

जळगाव एमआयडीसीत कारचोरीचा गुन्हा उघड; आरोपी अटकेत

चार लाख पन्नास हजाराची स्विफ्ट डिझायर हस्तगत

जळगाव – एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने कारचोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत चोरटे जेरबंद केले असून चोरी गेलेली तब्बल चार लाख पन्नास हजार रुपयांची स्विफ्ट डिझायर कार हस्तगत करण्यात आली आहे. शहरातील रामेश्वर कॉलनी भागातून घरासमोर पार्क केलेली कार रातोरात गायब झाल्याने परिसरात चिंता पसरली होती.

ही घटना अशी की, फिर्यादी यांनी दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारास स्वतःची मारुती स्विफ्ट डिझायर कार घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी कार दिसून न आल्याने शोधाशोध केली असता वाहन चोरी झाल्याची खात्री पटली. यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुरनं. ८५७/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याच्या तपासासाठी एमआयडीसी पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या माहितीसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे सखोल विश्लेषण केले. मिळालेल्या ठोस धाग्यांवरून आरोपीचा मागोवा घेत पथकाने जळगाव शहरातील नवनाथ नगर परिसरात सापळा लावून दिनांक २३ नोव्हेंबर रोजी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने विनय मनोहर जाधव (रा. नवनाथ नगर) असे नाव सांगत गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेली कार छत्रपती संभाजीनगर येथे नेल्याचेही उघड केले.

पोलिसांनी तत्काळ तेथून अंदाजे ४,५०,००० रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार हस्तगत केली. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

सदर कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या तपासात पीएसआय राहुल तायडे, पीएसआय चंद्रकांत धनके, हेड कॉन्स्टेबल सफी पाटील, प्रदीप चौधरी, रमेश चौधरी, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, तसेच पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी, नितीन ठाकुर, किरण पाटील, शशिकांत मराठे, नरेंद्र मोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम