शिंदे गटाच्या आमदारासह ४० जणांवर गुन्हा दाखल !
दै. बातमीदार । २८ जानेवारी २०२३ । राज्यातील शिंदे गटाच्या आमदारावर प्राचार्यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली येथील पॉलिटेक्नीक महाविद्यालयातील प्राचार्यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगर यांच्यासह ४० जणांविरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसांनी शनिवारी पहाटे गुन्हा दाखल केला. यात पाच प्राध्यापकांचाही समावेश आहे.
हिंगोलीतील पॉलिटेक्नीक महाविद्यालयातील वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलेच तापले होते. महाविद्यालयातील प्राध्यापकांसह महिला कर्मचाऱ्यांनी प्राचार्य डाॅ. अशोक उपाध्याय यांच्याकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आमदार संतोष बांगर हे 18 जानेवारी रोजी महाविद्यालयात गेले असता महिला प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच मांडला होता. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्यास मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला राजकीय वळण लागले होते.
दरम्यान, या प्रकरणात आज पहाटे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत डॉ. अशोक उपाध्याय यांनी म्हटले आहे की, आमदार संतोष बांगर, शंकर बांगर यांच्यासह प्राध्यापक अशा 40 जणांनी प्राचार्यांच्या कक्षेत येऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच सीसीटीव्हीचे, डीव्हीआरचे वायर तोडून पाच हजार रुपयांचे नुकसान केले. प्रचार्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आमदार संतोष बांगर, शंकर बांगर, महाविद्यालयातील अधिव्याख्याता यांच्यासह 40 जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक मगन पवार पुढील तपास करीत आहेत. आमदार संतोष बांगर यांनी 18 जानेवारी रोजी दुपारी 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांना मारहाण झाली होती. मात्र, या घटनेनंतर तब्बल 10 दिवसांनी प्राचार्यांनी तक्रार दिली. त्यामुळे 10 दिवसांनंतर दाखल झालेला गुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम