
बनावट दारू लेबल्ससह पकडली
बनावट दारू लेबल्ससह पकडली
सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त ; अलवाडी येथे दारूबंदी पथकाचा छापा
चाळीसगाव : तालुक्यातील अलवाडी येथील तिरमल्ली वस्तीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारूबंदी पथकाने धडक छापा टाकून अवैध दारू साठ्यावर कारवाई करत सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गौतम लक्ष्मण गरूड (वय ३३, रा. अलवाडी) याला अटक करण्यात आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जळगाव जिल्हा अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक अशोक तारू व चाळीसगावचे निरीक्षक किशोर गायकवाड यांनी ही कारवाई केली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तिरमल्ली वस्तीमध्ये छापा टाकण्यात आला असता गरूड याच्या घरातून विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या, बनावट लेबल्स व बुच असा एकूण २ लाख २५ हजार १६६ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
या प्रकरणी गौतम गरूड याच्याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे.
ही कारवाई निरीक्षक अशोक तारू, किशोर गायकवाड यांच्यासह दुय्यम निरीक्षक वाय. वाय. सूर्यवंशी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एन. व्ही. पाटील तसेच पथकातील आर. टी. सोनवणे, एन. बी. पवार, आर. पी. सोनवणे, व्ही. टी. हटकर, पी. एस. पाटील व व्ही. बी. परदेशी यांनी संयुक्तपणे केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम