
दै. बातमीदार । १४ डिसेंबर २०२२ । काही लोकांना वेगवेगळ्या ऋतूमध्ये विविध प्रकारचे आजार उद्भवित असतात तर हिवाळा प्रत्येकालाच आवडत असतो पण काहीना हिवाळ्याचा त्रास हि होत असतो त्यात जसजशी थंडी वाढते तसतसे कमी तापमानामुळे विविध आजारांचा धोकाही वाढतो. अशा वेळी थोडीसाही निष्काळजीपणा केल्यास ते आरोग्यासाठी कठीण ठरू शकते. सध्याच्या काळात हार्ट ॲटॅक आणि ब्रेन स्ट्रोक याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. एका आकडेवारीनुसार, भारतात दर तीन मिनिटांनी एका व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक येतो आणि इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात यामध्ये आणखी वाढ होते, अशी माहिती समोर आली आहे. हवामानातील बदलाचा शरीराच्या कार्यक्षमतेवर हळूहळू परिणाम होतो.
तापमान कमी झाल्यामुळे शरीरातील रक्त गोठण्याची शक्यता असते, ज्यामुळे शरीराच्या हालचालीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत रक्तप्रवाह करणाऱ्या धमन्या आकुंचन पावू लागतात आणि मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या रक्तप्रवाहाचा वेग मंदावतो. त्यामुळे हृदय आणि मेंदूला पुरेसे रक्त मिळत नाही. ऑक्सिजन आणि रक्ताच्या प्रवाहात अडथळा आल्याने रक्ताची गुठळी तयार होते. हाय ब्लडप्रेशरमुळे मेंदूतील रक्तवाहिन्या फुटतात, ज्यामुळे मेंदूत रक्तस्त्राव होतो.
ब्रेन स्ट्रोकचे दोन प्रकार असतात, पहिला म्हणजे इस्केमिक ब्रेन स्ट्रोक आहे. यामध्ये मेंदूच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याने रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. यामुळे त्यामुळे मेंदूच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे त्या पेशी वेगाने नष्ट होऊ लागतात. तर दुसऱ्या स्थितीत रक्तस्रावाचा झटका येतो. यामध्ये मेंदूची रक्तवाहिनी फुटल्याने रक्तस्त्राव होऊन अतंर्गत भागात रक्त साचते. यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. या स्थितीत जर नेळेवर उपचार झाले नाहीत तर संबंधित रुग्णाला अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो अथवा क्वचित ही परिस्थिती जीवघेणीही बनू शकते.
ब्रेन स्ट्रोकवरील उपचार
ब्रेन स्ट्रोकची लक्षणे जाणवल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात नेणे अवश्यक असते. हा त्रास झाल्यावर पहिले तीन ते चार तास (गोल्डन अवर्स) हे उत्तम उपचारांसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरतात. उपचार करताना, स्ट्रोकच्या स्थितीनुसार, डॉक्टर सीटी स्कॅन, एमआरआय यांसारख्या चाचण्या करून घेतात. एखाद्या प्रकरणामुध्ये रक्ताची गुठळी तयार झाली असेल तर, त्यावर औषधांनी उपचार करता येऊ शकतो. पण धमनी फुटल्यामुळे मेंदूच्या कोणत्याही भागात रक्ताच्या गुठळ्या झाल्या असतील तर शस्त्रक्रिया हाच पर्याय ठरतो.
ब्रेन स्ट्रोकची मुख्य लक्षणे
एखाद्या व्यक्तीचा चेहरा अचानक वाकडा होणे, शरीरातील एका हाता-पायाची ताकद कमी होत असल्यासारखे वाटणे, हात वर उचलणे आणि चालण्यास त्रास होणे अशा लक्षणांसह एखादी व्यक्ती जमीनीवर पाय घासून चालत असेल तर त्या व्यक्तीला उपचारांसाठी ताबडतोब रुग्णालयात नेले पाहिजे. याची इतर लक्षणे खालीलप्रमाणे –
– शरीर शिथिल होणे
– बोलताना त्रास होणे
– घाबरल्यासारखे वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे
– तीव्र डोकेदुखी
– चेहऱ्याची एक बाजू सुन्न अथवा बधीर होणे
– दृष्टी अंधुक होणे
– अस्वस्थ वाटणे अथवा उलटी होणे
– अशक्तपणासह गोंधळल्यासारखे होणे
अशी घ्या काळजी
– ताण घेणे टाळावे
– हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर नियमितपणे औषधे घ्या व ब्लड प्रेशर वेळोवेळी तपासत रहावे.
– धूम्रपान व मद्यपान करू नये
– सतत तीव्र डोकेदु्खीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवून योग्य उपचार करावेत.
– उन्हात फिरायला जावे, थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ते गरम कपडे घालावेत.
– मायग्रेनचा त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यावने औषध घ्यावे
– योगासने व प्राणायम करावा.
या लोकांना अधिक धोका :
– मधुमेह ग्रस्त व्यक्ती
– अतिरिक्त चरबी (कोलेस्ट्रॉल) ग्रस्त लोक
– अनियंत्रित वजन असलेले लोक
– गर्भवती महिला
– गर्भनिरोधक, हार्मोनल औषधे घेत असलेल्या महिला
– 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती
– गुंतागुंतीच्या, जटील आजारावर उपचार घेत असलेले रुग्ण
– अशक्तपणा असलेले रुग्ण
– ॲनिमियाचे रुग्ण

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम