चॅलेंज देऊन सांगतो अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाही !
बातमीदार | २८ ऑगस्ट २०२३ | राज्यात गेल्या काही महिन्यापासून मुख्यमंत्री पदी अजित पवार येणार असल्याच्या चर्चा जोर धरत होत्या. पण आजपर्यत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण याच मुद्याला धरत अनेक राजकीय नेते टीका टिपण्णी सुरु आहे. आज पुन्हा एकदा स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केलं आहे. मी चॅलेंज देऊन सांगतो अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं आयोजित स्वराज्य संघटनेच्या प्रथम वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणावर भाष्य करताना अजित पवारांवर त्यांनी सडकून टीकाही केली.
संभाजीराजे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस आधी राष्ट्रवादीसोबत युती कदापी नाही, कदापी नाही, कदापी नाही असं सांगत होते. तसेच अजित पवारांना तुरुंगात पाठवण्याची भाषा करत होते. पण त्यांनाच यांनी आता सोबत घेतलं आहे. गरज नसताना तुम्ही त्यांना बरोबर घेतलं आहे, लोकसभेसाठी तुम्ही हे केलं आहे का? निवडणूक संपल्यानंतर अजित पवार पुन्हा शरद पवारांसोबत जातील. अनेक लोक म्हणतात की, एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार, पण मी चॅलेंज देऊन सांगतो की अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाहीत”
दरम्यान, यावेळी संभाजीराजे यांनी भाजपला आपल्या जुन्या वचनांची आठवण करुन देताना मराठा आरक्षण आणि अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाचं काय झालं? पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन करुन नऊ वर्षे झाली तरीही हे काम अजून सुरु का होत नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम