जिल्ह्यात पुढील चार दिवस दमदार पावसाची शक्यता !
बातमीदार | ६ सप्टेंबर २०२३ | गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात पाठ फिरवलेल्या पावसाचे जिल्ह्यात पुन्हा आगमन होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसीत होत असून, यामुळे जळगाव जिल्ह्यात बुधवारपासून ते १० सप्टेंबरपर्यंत दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात जुलै महिना वगळता जून व ऑगस्ट हे दोन्ही महिने कोरडेच गेले आहेत. तसेच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊस झालेलाच नाही. महिनाभरापासून पाऊस नसल्याने तापमानात देखील मोठी वाढ झाली.
पारा ३५ अंशावर पोहचल्यामुळे जळगावकरांना ऐन श्रावणात घामाच्या धारा लागल्या होत्या. तर पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पीकं देखील संकटात आली आहेत. मात्र, जिल्ह्यात ६ ते १० सप्टेंबरदरम्यान जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसीत झाले असून, ६ सप्टेंबरनंतर हे क्षेत्र छत्तीसगड व विदर्भाकडे सरकणार आहे. त्यामुळे पुन्हा पावसाची स्थिती निर्माण होणार असून, यामुळे अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. ११ ते १३ सप्टेंबरपर्यंत काही तालुक्यांमध्ये किरकोळ पाऊस होऊ शकतो. मात्र, १४ सप्टेंबरनंतर पुन्हा काही दिवस पावसाचा खंड पडू शकतो. त्यानंतर पुन्हा जर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. तर गणेशोत्सव काळात पुन्हा पाऊस होऊ शकतो
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम