आयपीएलमध्ये चेन्नईने मिळविला थरारक विजय !
दै. बातमीदार । ३० मे २०२३ । देशात सुरु असलेल्या आयपीएलमध्ये हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज संघाने सोमवारी झालेल्या चित्तथरारक अंतिम सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सवर ५ गडी राखून विजय मिळवला. चेन्नईचे हे आयपीएलमधील ५ वे विजेतेपद ठरले. चेन्नईने याआधी २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते, तर गुजरातचा संघ २०२२ मध्ये अजिंक्य ठरला होता.
साई सुदर्शनच्या ४७ चेंडूंतील ९६ धावांच्या वादळी खेळीच्या बळावर गुजरातने ४ बाद २१४ धावा फटकावल्या. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकांत विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. हे लक्ष्य चेन्नईने १५ षटकांत ५ गडी गमावून पूर्ण केले.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना डेवोन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड यांनी गुजरातच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. या दोघांनी ३९ चेंडूंत चेन्नईला ७४ धावांची सलामी दिली. विशेषतः डेव्हन कॉन्वे याने हार्दिकच्या पहिल्याच षटकात एक षटकार व चौकार ठोकत १४ धावांची वसुली केली. त्यानंतर मोहंमद शमी यालाही सलग दोन चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. त्याने चौथे षटक टाकणाऱ्या राशीदचे स्वागत चौकाराने केले, तर याच षटकात ऋतुराज गायकवाडने षटकार व चौकार ठोकत चेन्नईचे धावांचे अर्धशतक चौथ्याच षटकात धावफलकावर लगावले. त्यानंतर कॉन्वेने जोश लिटिल याला षटकार खेचत आवश्यक धावगती ठेवली. मात्र, सातव्या षटकात नूर अहमद याने ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉन्वे यांना बाद करीत चेन्नईला दुहेरी धक्का दिला. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणे याने जोशला दोन षटकार आणि राशीद खान याला सलग दोन चौकार ठोकत चेन्नईला विजयी पथावर नेले. मात्र, धोकादायक ठरणाऱ्या रहाणेला मोहित शर्माने विजय शंकरकरवी झेलबाद करीत तंबूत धाडले. बाद होण्याआधी रहाणेने शिवम दुबेच्या साथीने २३ चेंडूंत ३९ धावांची भागीदारी केली. रहाणे बाद झाल्यानंतर खेळाची सूत्रे आपल्याकडे घेताना शिवम दुबेने राशीदला दोन षटकार खेचले. अखेरच्या १८ चेंडूंत ३८ धावांची गरज असताना रायुडूने मोहित शर्माला २ षटकार आणि एक चौकार ठोकला. मात्र, मोहितने याच षटकांत रायुडू वधोनी यांना सलग चेंडूंवर बाद करीत सामन्यातील चुरस वाढवली होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम