
भाजप नगरसेवक ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालवत होता छमछम !
दै. बातमीदार । १ जून २०२३ । राज्यातील अनेक ठिकाणी अवैध कारनामा सुरु असतांना एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवण्याचा धिंगाणा मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजपचे माजी नगरसेवक गणेश शेट्टी यांनी केल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. शेट्टी यांच्या भाईंदर पूर्वमधील अण्णा पॅलेस या वादग्रस्त बारवर पोलिसांनी छापा मारला त्यावेळी तिथे बारवाला अश्लील नृत्य करताना आढळून आल्या.
पोलिसांनी या बारमधून चार मुलींची सुटका केली असून ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवल्यामुळे यापूर्वीही बाबा पॅलेसवर कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा कारवाई झाल्यामुळे शेट्टी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
भाईंदर पूर्वेच्या अण्णा पॅलेस या ऑर्केस्ट्रा बारमध्ये बारबाला नृत्य करीत आहेत. अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त जयंत बजबळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी प्रथम खात्री करून घेतली आणि नंतर या बारवर छापा मारला. त्यावेळी त्या ठिकाणी चार बारबाला अश्लील नृत्य आणि हावभाव करताना आढळून आल्या. पोलिसांनी या बारमधून चार मुलींची सुटका केली तर दीपक पुजारी, रघु ऊर्फ रॉबिन जॉन्सन, संजय पाणी, विशालकुमार केसरी, बलराम पासवान, अर्जुन राम, अमरजित गुप्ता, कन्हैया पासवान, रूपेशकुमार यादव व यादव कोरगा आणि मिथुन वाडेकर आणि चालक-मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
मद्य परवाना झाला होता रद्द यापूर्वी अण्णा पॅलेस या ऑर्केस्ट्रा बारवर तोडक कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी प्रशासनाने बारचा मद्य परवाना रद्द केला होता. aur पॅलेसमध्ये पुन्हा बारबालांचा डान्स होणार नाही या अटीवर मद्य परवाना पुन्हा देण्यात आला होता. मात्र आता अण्णा पॅलेसमध्ये डान्सबार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे प्रशासन बारवर नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक भाजपचे माजी नगरसेवक शेट्टी यांनी वेश्या व्यवसाय चालवल्याप्रकरणी त्यांच्यावर पिटा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. अण्णा पॅलेस हा बार पालिकेकडून अनधिकृत घोषित करण्यात आला आहे. या बारवर कारवाई झाल्यानंतर तिथे डान्सबार सुरू होता. मात्र या बारवर स्थानिक पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी पोलीस उपायुक्तांच्या पथकाने कारवाई केली. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मीरा-भाईंदर पोलीस दलात अनेक तर्कवितर्कांची चर्चा सुरू झाली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम