मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दिवशी घेणार रामलल्लाचे दर्शन !
दै. बातमीदार । ३ एप्रिल २०२३ । राज्यात शिंदेंची शिवसेना व ठाकरे गटाचे एकमेकावर टीका टिपणी सुरु असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम ठरला असून, ९ एप्रिल रोजी एकनाथ शिंदे अयोध्येत जाऊन रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. मागील वर्षी विमानातून उतरविण्यात आल्याने दर्शन हुकलेल्या त्या सर्व आमदारांचे यावेळेस दर्शन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. शरयु नदीवर आरती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अयोध्या दौरा हा आपल्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही त्याच्याकडे राजकारण म्हणून पाहणार नाही. अयोध्येत शरयू नदीच्या किनारी राम मंदिर व्हावे, हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करत आहेत. यामध्ये खारीचा वाटा म्हणून आम्ही सागाची लाकडं पाठवली आहेत. राम मंदिर आंदोलनावेळी आनंद दिघे यांनी राम मंदिरासाठी चांदीची विट पाठवली होती, अशी आठवणही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितली.
रविवारी संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. त्यावर ‘चांगले लोक एकत्र येतात, त्याला वज्रमुठ म्हटले जाते पण, सत्तेसाठी हापापलेले लोक एकत्रित येत असल्याने ही व्रजझुठ आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. “बाळासाहेबांनी संभाजीनगरची मागणी केली होती आणि आज तिथेच ही सभा होत आहे. बाळासाहेबांनाही हे पाहून दुःख होत असेल. सावरकरांनी देशासाठी समुद्रात उडी टाकली, हे सत्तेसाठी कोलांटउड्या मारतात. राज्यातील जनता सुज्ञ आहे, त्यांना चोख उत्तर देईल” असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
“शिवधनुष्य पेलविण्यासाठी मोठे मन लागते. तशाप्रकरचे विचार लागतात आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे रहावे लागते. हे सर्व बाळासाहेब ठाकरे करीत होते. परंतु या गोष्टी गेल्या काही वर्षात कालबाह्य झाल्या. स्वत: पुरता आणि कुटुंबापुरता विचार सुरु झाला. कार्यकर्त्यांना तुमचे तुम्ही पाहून घ्या असे सांगितले जाऊ लागले. यामुळेच आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी हे शिवधनुष्य हातात घेतले आहे. जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्याबरोबरच जनतेच्या अपेक्षांप्रमाणे काम करीत आहोत” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम