मुख्यमंत्री शिंदेंनी कान टोचल्यानंतर अब्दुल सत्तार अज्ञातवासात ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ नोव्हेबर २०२२ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचल्यानंतर सत्तार यांनी आजचा बुलढाणा जिल्ह्यातला दौरा रद्द करत अज्ञातवासात गेल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सु्प्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सत्तार चर्चेत आहेत. त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.
सत्तार आज मंगळवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते सकाळी सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेणार होते. त्यानंतर चांगेफळ येथील अखंड हरीनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार होते. मात्र, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सत्तारांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी हा दौरा रद्द केला.

अब्दुल सत्तार यांनी काल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर काही वेळातच सॉरी म्हणत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील घरासमोर निदर्शने केली. घरावर दगडफेक केली. वाढता प्रक्षोभ पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कान टोचले. तसेच पुन्हा माफी मागण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी सिल्लोड येथील जाहीर सभेत पुन्हा दिलगिरी व्यक्त केली. आता त्यांना अज्ञातवासात राहण्याच्या सूचना दिल्याचे समजते. ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. अब्दुल सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही समर्थन केले नाही. शिवाय सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेणार का, असा रोखठोक सवाल शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम