
चोपड्याच्या नगराध्यक्षा नम्रता पाटील यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सत्कार
चोपड्याच्या नगराध्यक्षा नम्रता पाटील यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सत्कार
शहराचा चेहरामोहरा बदलणार; विकासाला नवी दिशा – आ. चंद्रकांत सोनवणे
चोपडा प्रतिनिधी : चोपडा शहराच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील यांच्या दणदणीत विजयाबद्दल उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांनी मुंबई येथे त्यांची विशेष भेट घेत सत्कार केला. मंगळवारी मुंबईतील ना. शिंदे यांच्या निवासस्थानी हा भव्यदिव्य सत्कार सोहळा पार पडला.
चोपडा शहराच्या राजकीय इतिहासात प्रथमच शिवसेनेला नगरपालिकेवर एकहाती सत्ता मिळवून देण्यात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना मोठे यश आले आहे. या निवडणुकीत आमदार चंद्रकांत सोनवणे आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. संदिप पाटील यांनी एकत्र येत निवडणूक लढवली आणि नगरपालिकेवर निर्विवाद सत्ता प्रस्थापित करत इतिहास घडविला. शिवसेनेच्या २१ जागा तर काँग्रेसच्या चार जागा निवडून आल्याने नगरपालिकेत स्थिर व भक्कम सत्तास्थापन झाली आहे.
नगरपालिकेत एकहाती सत्ता आल्यामुळे आता विकासकामांना कोणताही अडथळा राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नगरपालिका ताब्यात घेण्यात शिवसेनेला मोठे यश मिळाले असून, येणाऱ्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांतही शिवसेनेचाच वरचष्मा राहील, असा आत्मविश्वास पक्षाकडून व्यक्त केला जात आहे.
शहरातील अपूर्ण विकासकामे, सुशोभीकरण तसेच मूलभूत सुविधा लवकरच पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी यावेळी दिले. चोपडा शहराला प्रथमच उच्च शिक्षित तरुण महिला नगराध्यक्षा लाभल्याने महिला वर्गात विशेष उत्साहाचे वातावरण आहे. माजी आमदार लता सोनवणे व आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनी सांगितले.
या सत्कार समारंभास आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, उद्योजक सचिन रविंद्र पाटील, कुलदीप पाटील, गणेश भोईटे यांच्यासह शिवसेना व मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम