
चोपडा तालुक्यातील धानोरा आणि लासूर आरोग्य केंद्रात नवीन रुग्णवाहिका
चोपडा तालुक्यातील धानोरा आणि लासूर आरोग्य केंद्रात नवीन रुग्णवाहिका
आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत केलेल्या विविध प्रस्तावांना मंजुरी
जळगाव: जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चोपडा मतदारसंघाचे आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या समस्या आणि विकासकामांवर लक्ष वेधले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी मांडलेल्या अनेक मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
आरोग्य आणि वीज समस्यांवर भर
आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी लासूर आणि धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन रुग्णवाहिकांची मागणी केली. यावर तात्काळ कार्यवाही करत पालकमंत्र्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नवीन रुग्णवाहिकांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे निर्देश दिले. तसेच, मतदारसंघातील वाढती विजेची मागणी लक्षात घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतून चोपडा तालुक्यात एक नवीन ३३ के.व्ही.ए. उपकेंद्र उभारण्याची मागणीही त्यांनी केली.
जीर्ण वीज तारा बदलण्याची मागणी
चोपडा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये जुनाट वीज खांब (पोल) आणि तारांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे आर्थिक आणि जीवित हानीचा धोकाही वाढत आहे. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी महावितरणला गावनिहाय आराखडा तयार करून ५०० नवीन वीज खांब आणि तारांसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली.
पर्यटन आणि वनसंवर्धनासाठी निधी
यावल वनविभागाच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि वनसंपदेच्या जतन व संवर्धनासाठी वाढीव निधीची तरतूद करण्याची मागणी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केली.
आबापाणी कॅम्पिंग साईट: वैजापूर, ता. चोपडा रेंज अंतर्गत असलेल्या आबापाणी येथे स्थानिक लोकांच्या मदतीने कॅम्पिंग साईट आणि लोटस पार्क उभारण्यासाठी २ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली.
चौगावचा विजयगड किल्ला: चौगाव येथील विजयगड किल्ल्याला ट्रेकिंग स्पॉट म्हणून विकसित करण्यासाठी रस्ते, किल्ल्यासाठी पायऱ्या, रेलिंग, सेल्फी पॉईंट आणि इतर पायाभूत सुविधांसाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी त्यांनी केली.
इतर महत्त्वाचे मुद्दे
घरकुल योजना: कठोरा येथे ८४ घरकुल लाभार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जागेवर ग्रामपंचायत विरोध करत असल्याने, त्यांना तातडीने घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्याची मागणीही आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केली.
बालगंधर्व नाट्यगृह: तसेच, जळगाव शहरातील बालगंधर्व नाट्यगृहाची दुरुस्ती करण्याची मागणीही त्यांनी केली.या बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, किशोर पाटील, अमोल पाटील, मंगेश चव्हाण, अमोल जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे आणि प्रकल्प अधिकारी अरुण पवार उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम