
सोनसाखळी चोरीचा अखेर उलगडा; दोन दुचाकीस्वार जेरबंद, सोन्याचा मुद्देमालही हस्तगत
सोनसाखळी चोरीचा अखेर उलगडा; दोन दुचाकीस्वार जेरबंद, सोन्याचा मुद्देमालही हस्तगत
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एमआयडीसी परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांवर लगाम घालत पोलिसांनी अयोध्या नगर भागात महिलेकडून जबरीने सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दुचाकीस्वारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे. अवघ्या काही दिवसांतच राबवलेल्या सखोल तपासातून दोन संशयितांना अटक करत चोरीस गेलेली सोन्याची लगडही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी अयोध्या नगरात घडलेल्या या घटनेत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी पलायन केले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांना आरोपींबाबत महत्त्वाच्या सुगावा मिळाले. १८ नोव्हेंबर रोजी माऊली नगर येथे सापळा रचून पोलिसांनी तेजस अनिल ईखनकर (रा. ज्ञानदेव नगर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार प्रसाद उर्फ परेश संजय महाजन (रा. ज्ञानदेव नगर) याचे नाव उघड केले. विशेष म्हणजे, प्रसाद हा शनिपेठ हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातून आधीपासूनच फरार होता.
त्यानुसार, पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी त्यालाही माऊली नगर परिसरातून ताब्यात घेतले. दोघांकडून ८ ग्रॅम वजनाची, सुमारे ८० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी केले. तपास पथकात पोउनि राहुल ताडे, पोउनि चंद्रकांत के., सफौ विजयसिंग पाटील, पोह प्रदीप चौधरी, पोह गिरीश पाटील, पोह प्रमोद लावंजारी, पोह किरण पाटील ठाकूर, पोकॉ किरण पाटील, पोकॉ शशिकांत मराठी, पोकॉ चेतन पाटील यांचा समावेश होता. या कारवाईला पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम