जळगावात सिनेस्टाईल दरोडा : साडे तीन कोटीच्या दागिन्यासह १७ लाख लंपास !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ जून २०२३ ।  जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेमध्ये गुरुवारी दिवसाढवळ्या सिनेस्टाईल जबरी चोरी झाली. काळे कपडे आणि हेल्मेट घालून आलेल्या दोन चोरट्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून चाकूचा धाक दाखवून बंधक बनविले. एवढेच नव्हे तर बैंक व्यवस्थापकाच्या पायावर चाकू मारून जखमी केले. बँक कर्मचारी पुरते हादरून गेल्यानंतर त्यांच्या भीतीचा गैरफायदा घेत चोरटे बँकेतील सुमारे साडेतीन कोटींचे सोने व १७ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पसार झाले. ही संपूर्ण घटना सकाळी ९:३० ते १० वाजेच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी व्यवस्थापकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय घडली घटना ?

कालिंका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बैंक ऑफ इंडियाची शाखा आहे. गुरुवारी सकाळी बैंक उघडून नियमितपणे कारभार सुरू झाले. सकाळची वेळ असल्यामुळे बँकेत मोजकेच कर्मचारी वगळता जास्त लोक नव्हते. सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास काळे कपडे व हेल्मेट घातलेल्या दोन चोरट्यांनी मागच्या दरवाजाने बँकेमध्ये प्रवेश केला. सफाई कर्मचारी मनोज रमेश सूर्यवंशी व सुरक्षारक्षक संजय गोविंदा बोखारे यांच्या डोळ्यामध्ये स्प्रे मारून मारहाण केली आणि वॉशरूमकडे नेत तोंडाला चिकटपट्ट्या लावून बांधून ठेवले. कैश इन्चार्ज देवेंद्र नाईक व क्रेडिट कार्ड कर्मचारी नयन गिते यांनासुध्दा चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत एका ठिकाणी बसवून ठेवले. गिते हे खिशातून मोबाइल काढत असल्याचा संशय आल्यामुळे एका चोरट्याने त्यांच्या दिशेने चाकू भिरकावला. त्यात गिते यांच्या हाताच्या बोटाला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक संदीप गावीत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव शहर, शनिपेठ, जिल्हापेठ आणि एमआयडीसी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम