जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

बातमी शेअर करा...

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर

जळगाव (प्रतिनिधी) – अतिवृष्टी आणि नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत न मिळाल्याने जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देऊन जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, अनेक गावांतील घरे, जनावरे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी माती वाहून गेल्याने शेती पूर्णपणे बरड झाली आहे. राज्य सरकारने तातडीने जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.”

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, “सप्टेंबर महिन्यात सलग तीन टप्प्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, एरंडोल यांसह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी साचून मोठे नुकसान झाले. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील ८४१ गावे, २ लाख ९ हजार २७३ शेतकरी आणि १ लाख ६४ हजार ५५१ हेक्टर शेती बाधित झाली आहे.”

काँग्रेसने मागणी केली आहे की, बाधित शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून मदत वितरित करण्यात यावी, तसेच सर्व तालुक्यांमध्ये विशेष शिबिरे घेऊन शेतकऱ्यांची नुकसानभरपाई तत्काळ दिली जावी.

या निवेदनावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम