पदवीधर निवडणुकीसाठी कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर !
राज्यात निवडणुकीचे वेध पदवीधर निवडणुकीपासून सुरु झाले. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी याबाबत अधिकृतपणे घोषणा केली आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसच्या वतीने पदवीधर मतदारसंघातून उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. मात्र, भाजपकडून कोण उमेदवारी दाखल करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे भाजपकडून अद्याप उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे.
काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे आज अर्ज दाखल करणार आहेत. भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले खासदार सुजय विखे यांचे निकटवर्तीय ॲड. धनंजय जाधव हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अहमदनगरमधून नाशिकमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे भाजपकडून उमेदवारीचा काय निर्णय होतो? याकडे नगरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी पूर्ण केली आहे. वेळप्रसंगी ते अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल करू शकतात, असे राजकीय वर्तुळातून सांगितले जाते. दरम्यान, अहमदनगरमधून बुधवारी वंचित बहुजन आघाडी व एक अपक्ष असे दोन अर्ज दाखल झाले आहेत.
नाशिकमध्ये बुधवारी अपक्ष म्हणून प्रा. सुभाष चिंधे व वंचित आघाडीमार्फत रतन बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस उरले असताना काँग्रेस व भाजपकडून उमेदवार जाहीर न झाल्याने उत्सुकता वाढली होती. त्यातच काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे सुपुत्र सत्यजित तांबे भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त पसरले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. काँग्रेसकडून ही अफवा असल्याचे जाहीर करत डॉ. तांबे काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही स्पष्ट केले. मात्र, तरीही सत्यजित तांबे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा सुरू आहे. तशी तयारीही त्यांनी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम