पुण्याची पोटनिवडणुकीत कॉंग्रेसलाच उमेदवारी ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ जून २०२३ ।  कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेसला मोठे यश मिळाल्यानंतर देशात पुन्हा एकदा कॉंग्रेसची लाट येण्याची शक्यता असल्याने कॉंग्रेस नेत्यांनी आता राज्यात देखील आपलाच उमेदवार असेल यावर एकमत झाल्याची चर्चा राज्यभर होत आहे. राज्यातील पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या जागेवरून आता महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुणे लोकसभा निवडणुकीवर दावा करत आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेसला जागा असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी या मतदारसंघात आमचे राजकीय वर्चस्व जास्त आहे असे म्हणत या जागेवर दावा केल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच त्यात रंगत आली आहे. काँग्रेसने लगेचच हा दावा खोडून काढला. कसबा विधानसभेतील विजयामुळे महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे. याचदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार असल्याचे स्पष्ट सांगिलेय. कुणी काहीही दावा केला तरी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. अजित पवार ही जागा राष्ट्रवादी लढवेल असा दावा करत असले तरी, पारंपरिक पद्धतीने जो लढत आलाय, त्यानेच तो लढवावा आणि त्यावर आम्ही ठाम राहू. आत्ता ही ४८ लोकसभेबाबत ही तीच चर्चा आहे. पारंपरिक पद्धतीनेच लढली जाईल, असं बाळसाहेब थोरात यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभेच्या सध्याच्या सभागृहाची मुदत संपण्याला केवळ वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यातही निवडणुकीचा कार्यक्रम लक्षात घेतला तर तसे ९ महिनेच बाकी आहेत. त्यामुळे इतक्या कमी कालावधीसाठी पोटनिवडणूक घेतली जाईल, अशी शक्यता कमी दिसत आहे. राजकीय स्थितीचाही सत्ताधाऱ्यांकडून विचार केला जात आहे. कसबा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. ताेही ११ हजार मतांच्या फरकाने झाला. त्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही ते राज्य भाजपच्या हातातून गेले. यातून जनमत सध्या बरोबर नसल्याची भीती भाजपमध्ये आहे.

ही जागा काँग्रेसकडे आहे- मोहन जोशी
आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढणार आहोत. आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे आहे. ती पूर्वापार आमचीच आहे. मागील दोन पराभव वगळता त्याआधी अनेक वर्षे पुणे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचेच वर्चस्व होते. पोटनिवडणूक कधीही झाली तरी आमची तयारी आहे. अलीकडे केंद्र सरकारचा हस्तक्षेप प्रत्येक स्वायत्त संस्थेत होत असतो. त्यामुळे एकूण राजकीय स्थिती पाहता निवडणूक होईल, असे काँग्रेसच काय, सर्वच विरोधी पक्षांना वाटत आहे, असं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम