
देशाच्या आणि समाजाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान फार महत्त्वाचे : पो. नि. राजेंद्र पाटील
भडगाव/प्रतिनिधी
देशाच्या आणि समाजाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे महिलांच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. महिला या अबला नसून सबला आहेत. त्यांचे सक्षमीकरण करण्यास त्या स्वतः समर्थ आहेत. असे असले तरी त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न बऱ्याच वेळा उद्भवतो. यासाठी समाज म्हणून आपण पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून येऊ घातलेले नवीन शैक्षणिक धोरण आणि त्यात मुलींचे स्थान कुठे असेल याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आय.क्यू.ए.सी.) व युवती सभा यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले.
राजमाता-राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विचारमंचावर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक विनय जकातदार, प्राचार्य डॉ.एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील यांची विशेष उपस्थिती होती. करिष्मा जोशी (द्वितीय वर्ष विज्ञान) या विद्यार्थिनीने यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. युवती सभा प्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. शिवाजी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम