बातमीदार | ३ ऑक्टोबर २०२३
राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएच्या मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्यांपैकी एक असलेला इसिसचा संशयित दहशतवादी शाहनवाजला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. शाहनवाजसोबत अन्य दोन संशयितानादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण उत्तर भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा कट आखत होते. शाहनवाजच्या डोक्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री साऊथ-ईस्ट दिल्लीत कारवाई करत शाहनवाजला अटक केली होती. त्याच्याजवळून रासायनिक पदार्थ आणि आयईडी स्फोटके बनवण्यासाठी वापरण्यात येणारे अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. शाहनवाजशिवाय मोहम्मद रिजवान आणि मोहम्मद अरशद वारसी नामक अन्य दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांबरोबर अन्य संशयिताची पोलिसांकडून कसून केली जात आहे. शाहनवाज हा पुणे पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यानंतर दिल्लीत लपून राहत होता. त्याच्यासंदर्भात माहिती मिळल्यानंतर विशेष पथकाने अटकेची कारवाई केली. व्यवसायाने अभियंता असलेला शाहनवाज हा उत्तर भारतात हल्ला करण्याचा कट आखत होता. एनआयएकडून अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम