धनंजय मुंडेंच्या विधानाची राज्यभर चर्चा ; बहिण-भाऊ येणार एकत्र ?
दै. बातमीदार । १२ एप्रिल २०२३ । भाजप नेते स्व.गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यापासून मुंडे परिवारातील बहिण भावामध्ये मोठी फुट पडली होती. त्यावर नेहमीच आरोप प्रत्यारोप होत असल्याने हि फुट आणखी वाढत जात होती पण आता यावर पडदा पडल्याचे चित्र दिसू लागले आहे. आमच्या दोघात बहिण भावांचे नात उरलं नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं. मात्र, आता भगवानगडाच्या पायथ्याशी दोन्ही नेते एकत्र आल्याचं दिसून आलं.
“पंकजा मुंडे आणि माझ्यामध्ये विचाराचं वैर असलं तरी आम्ही आध्यात्मिक ठिकाणी राजकारण करत नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यावेळी केलं. आमचे विचार वेगळे असले तरी घरामध्ये मात्र तसूभरही अंतर नसल्याचं मुंडे म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. संत भगवान बाबांच्या नारळी सप्ताहात भारजवाडी गावात मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले होते. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. तर मी भगवान गडाची पायरी असल्याचं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. त्याला प्रतिउत्तर म्हणून धनंजय मुंडे म्हणाले की, पंकजा मुंडे जर या गडाची पायरी असतील तर त्या पायरीचा मी दगड आहे. गडासाठी कोणी काय केलं हे सर्वांना माहीत आहे. पंकजामध्ये आणि माझ्यामध्ये एक सुईच्या टोका एवढेही वैर नाही आमची राजकीय लढाई वेगळी असल्याचंही मुंडे यावेळी म्हणालेत.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्याचं पाहून उपस्थित असलेल्या एका कार्यकर्त्याने दोघांनी कायमचं एकत्र यावं अशी विनंती केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी देव करतो ते भल्यासाठीच करतो असं म्हंटलं आहे. पंकजा मुंडेही आमदार झाल्या, त्यानंतर मंत्री झाल्या. मीही आमदार झालो आणि मंत्री झालो. त्यामुळे आम्ही दोघे एकत्र असतो तर एकालाच ही संधी मिळाली असती. मात्र, आम्ही वेगळे आहोत त्यामुळं तुम्हीही समजून घ्यायला पाहिजे असं धनंजय मुंडे पुढे म्हणालेत. यापुढे गडाच्या संदर्भात राजकारण करणार नसल्याचं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या “धनंजय व माझ्यात काहींनी भांडण लावले. ते कशासाठी, हे माहीत नाही, मात्र माझ्यासाठी जनता महंत आहे. मला गडाचे राजकारण करण्याची गरज नाही. सध्याचे सरकार चांगली मदत करत आहे. मी खूप गरीब आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुम्हाला चुकीचे सांगितलेले दिसत आहे. आमच्यात लढाया लावणाऱ्यांना काय साध्य करायचे आहे, ते मला माहीत नाही.”
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम