
धरणगावात भरधाव डंपरने सायकलस्वाराला चिरडले; नागरिकांमध्ये तीव्र संताप
धरणगावात भरधाव डंपरने सायकलस्वाराला चिरडले; नागरिकांमध्ये तीव्र संताप
वाळू तस्करीचा धुमाकूळ सुरूच, प्रशासन हतबल
धरणगाव (प्रतिनिधी) : वाळूच्या अवैध वाहतुकीसाठी भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने सायकलस्वाराला जोरदार धडक दिल्याने ६५ वर्षीय दत्तात्रय शंकर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात महावीर जिनिंगसमोर, जळगाव रोडवर गुरुवारी रात्री ७.३० वाजता घडला.
बांभोरी ते धरणगावदरम्यान डंपर चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत अनेक वाहनांना कट मारला. यामुळे अनेक वाहनचालक भयभीत झाले, मात्र पुढे गेल्यावर हा दुर्दैवी अपघात उघडकीस आला.
अपघाताचा थरार
धरणगाव येथील दत्तात्रय शंकर पाटील (वय ६५) हे महावीर जिनिंगमध्ये वॉचमन म्हणून नोकरीला होते. गुरुवारी रात्री ७.३० वाजता ते सायकलवरून जिनिंगकडे जात असताना, जळगावहून भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने (MH04/FJ8083) त्यांना जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की, डंपरने सायकल व सायकलस्वाराला तब्बल ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले. यामुळे दत्तात्रय पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
मागून येणारे माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे, प्रतीक जैन आणि स्वप्नील भोलाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना तत्काळ माहिती दिली.
शिवसैनिक पाटील यांनी जखमी दत्तात्रय पाटील यांना आपल्या वाहनातून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर परिसरात संतापाची लाट
मृत दत्तात्रय पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि सुन असा परिवार आहे. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पाटील यांच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली.
डंपर वाळूने भरलेला होता आणि अपघातानंतर चालक फरार झाला आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दिली.
मृत दत्तात्रय पाटील हे एसटी चालक समाधान पाटील यांचे वडील होते.
वाळू तस्करीमुळे जीवघेणे अपघात; प्रशासन हतबल
धरणगाव व परिसरात वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दिवसाढवळ्या भरधाव डंपर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत, मात्र प्रशासन मात्र हतबल असल्याचे चित्र दिसत आहे.
या अपघातामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम