हे प्रशासनाला कळले नाही का? ठाकरेंचे सरकारवर टीका !
दै. बातमीदार । १७ एप्रिल २०२३ । राज्य सरकारतर्फे रविवारी ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा नवी मुंबई येथील खारघरमधील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर भरदुपारी घेण्यात आला होता.
यावेळी उष्माघातामुळे १२ श्री सदस्यांचा मृत्यू झाला असून शेकडो जण उष्माघाताने अत्यवस्थ असल्याचे समोर आले. यानंतर आता राज्यातील राजकारण तापले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीदेखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी एमजीएम रुग्णालयामध्ये रुग्णाची भेट घेतली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ट्विट करत म्हणाले आहेत की, “ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हा पुरस्कार घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचे आणि सरकारचे अभिनंदन केले होते. पण या सोहळ्याला जे गालबोट लागले ते टाळता आले नसते का? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. असे असताना इतक्या कडाक्याच्या उन्हामध्ये हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी, हे प्रशासनाला कळले नाही का?” असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.
पुढे राज ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली, तरी एवढ्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत. तसेच, प्रशासन अशा चुका करणार नाही याची काळजी घ्यावी. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम