हिवाळी अधिवेशनात आमदारांना डिजिटल माहिती पुस्तिका; अधिवेशन होणार हायटेक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ डिसेंबर २०२२ । राज्यातील आमदारांचे आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनास सुरूवात होत आहे. सभागृहातील सर्व सदस्यांना नव्या लॅपटॉपसह, वायफाय व विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विधिमंडळ सत्रातील उपलब्ध सुविधांबाबतचे नवे कोरे ॲप तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक सदस्याला दिलेली डिजिटल माहिती पुस्तिका यामुळे यावेळेचे अधिवेशन अधिक हायटेक व नवीन सुविधांसह सुरू होणार आहे.

विधानभवन परिसरात चोख बंदोबस्त
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसर आणि बाहेरील व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. ट्रॅफिक आणि पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. विधिमंडळ परिसर आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. महिला पोलिसांसाठी विशेष काळजी घेण्यात आली असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

एका क्लिकवर सर्व माहिती
नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील सेटट्राईब ह्या आयटी कंपनीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘महा असेंम्बली’ ह्या ॲप चे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या ॲपद्वारे सर्व मंत्री, आमदार, सचिव स्तरावरील पदाधिकारी यांना अधिवेशनादरम्यान त्यांची निवास व्यवस्था, अधिवेशन दैनंदिनी, महत्वाच्या व्यक्तींची टेलिफोन निर्देशिका, इतर महत्वाचे सहाय्य, विविध बैठकांचा तपशील एका क्लिक वर मिळू शकणार आहे. अँड्रॉइड ॲप, वेब व्यू तसेच ॲपल स्टोरवर हे ॲप उपलब्ध असणार असून फक्त अधिकृत वापरकर्त्यानाच अर्थात सदस्यांनाच या ॲपचा एक्सेस असणार आहे.

महिला आमदारांसाठी शिशू संगोपन कक्ष
महिला आमदारांसाठी विधानभवनात शिशू संगोपन कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महिला पोलिसांच्या सोयीसुविधा तसेच खासगी वाहनांच्या दर नियंत्रणाबाबत यापूर्वीच निर्देश दिले. याशिवाय विधानसभा अध्यक्ष यांनी केलेल्या सूचनेनुसार पत्रकारांसाठी अतिरिक्त कक्ष उभारण्यात आला आहे. इलेक्ट्रानिक्स माध्यमांसाठी वेगळी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिवेशनासाठी येण्यासाठी व जाण्यासाठी रेल्वे आणि विमान प्रवासासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिल्या आहे. विमानाच्या अतिरिक्त फेऱ्या सुटीच्या दिवसांमध्ये वाढविण्याची सूचना त्यांनी केली.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम