‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ जिल्हास्तरीय अभियानास प्रारंभ

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ सप्टेंबर २०२२ । धुळे येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यात 18 वर्षांवरील महिला माता व गर्भवतींच्या तपासणीसाठी ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उदघाटन करण्यात आले, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

या अभियानांतर्गत 18 वर्षांवरील महिलांची आरोग्य तपासणी मोहीम राबविणे आणि २६ ऑक्टोबर २०२२ पर्यंतच्या कालावधीत संदर्भिय सेवा देण्यात येणार आहे. महिलांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे व सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर येथे उदघाटन झाले. यानिमित्त आरोग्य व दंत तपासणी शिबिर झाले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समिती सभापती मंगलाताई पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती धरतीताई देवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ध्रुवराज वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सभापती श्रीमती पाटील, श्रीमती देवरे यांनी महिलांना आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वानेरे यांनी स्त्रियांमधील कर्करोग, कॉकलिअर, इम्प्लांट सर्जरी, हृदय रोग तपासणी याविषयी, तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी महिला व मातांना देण्यता येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. तसेच या अभियानाच्या यशस्वितेसाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, असे सांगितले.

या अभियानात महिला व मातांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. वजन व उंची घेवून बीएमआय काढणे, एचबी, रक्त, लघवी तपासणी, आवश्यकतेनुसार एक्स- रे, मेमोग्राफी करणे, कर्करोग, रक्तदाब व मधुमेह तपासणी, आरटीआय, एसटीआय तपासणी व माता व बालकांचे लसीकरण करणे, आवश्यकतेनुसार नमूद तपासणीनंतर तज्ज्ञांमार्फत अतिजोखमीच्या माता, बालकांची तपासणी, सोनोग्राफी करणे, या कालावधीत आवश्यक औषधोपचार, आयएफए, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम, आयर्न, सुक्रोज गोळ्यांचे वाटप करणे, पोषण व आहार, स्तनपान, कुटुंब नियोजन, मानसिक आरोग्य याविषयी देखील समुपदेशन करण्यात येणार आहे.

अन्न पदार्थ निर्मिती आस्थापनांची नियमितपणे तपासणी करावी : जिल्हाधिकारी

आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना स्वच्छ व दर्जेदार मालाचा पुरवठा होण्यासाठी अन्न्‍ पदार्थ निर्मिती आस्थापनांची नियमितपणे तपासणी करून अहवाल सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी दिले आहेत, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत गठित सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे, अन्न सुरक्षा अधिकारी कि. हि. बाविस्कर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. श्री. कांबळे यांनी सांगितले, एक एप्रिल २०२२ पासून १ लाख १४ हजार ४८० रुपये किमतीचे अन्नपदार्थ जप्त केले आहेत. तसेच तडजोड दंड प्रकरणी २० हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. आगामी काळात जास्तीत जास्त अन्न पदार्थ आस्थापनांची तपासणी करून भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही श्री. कांबळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम