काय दाऊदचा फोटो लावायचा का? भाजपने केला सवाल !
दै. बातमीदार । १९ डिसेंबर २०२२ । देशात गेल्या काही दिवसापासून महापुरुषांच्या नावाने सुरु असलेले राजकारण आता कर्नाटकाच्या विधानसभेत हि पाहायला मिळाले. कर्नाटकाच्या विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो लावल्याने गदारोळ झाला आहे. विधानसभा असेंबली हॉलमध्ये सावरकरांचा फोटो लावल्याने राज्य सरकारच्या या कृतीचा काँग्रेसने निषेध नोंदवला आहे. सावरकर ही वादग्रस्त व्यक्ती होती. त्यांचा फोटो असेंबली हॉलमध्ये लागता कामा नये, असं काँग्रेसने म्हटलंय. तर सावरकरांचा फोटो लावायचा नाही तर काय दाऊदचा फोटो लावायचा का? असा सवाल भाजपने केला आहे. दरम्यानस काँग्रेस आमदारांनी पंडीत नेहरू यांच्यासह इतर महापुरुषांचे फोटो हातात घेऊन जोरदार निदर्शने केली.
आज सकाळी कर्नाटकाच्या विधानसभेच्या असेंबली हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या फोटोचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमैय्या यांच्यासह काँग्रेस आमदारांनी जोरदार निदर्शने केली. काँग्रेस आमदारांनी या संदर्भात कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांना पत्रंही लिहिलं.
विधानसभेत महात्मा गांधी, बसवन्ना, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल आणि स्वामी विवेकानंद यांचेही फोटो लावण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. काँग्रेसच्या आधीच्या नेत्यांनाही सावरकरांची अडचण वाटत होती. सावरकरांच्या फोटोला विरोध करणं योग्य नाही. सावरकर देशभक्त होते. अंदमान निकोबारच्या जेलमध्ये त्यांनी बरीच वर्ष काढली. काँग्रेस नेते तुरुंगात एक दिवसही राहू शकत नाहीत. काँग्रेसने देशासाठी त्याग केला असं तुम्ही वारंवार म्हणताय. तुम्ही ज्या काँग्रेसबाबत म्हणताय ती काँग्रेस ही नाही. आजची काँग्रेस बोगस आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली.
सावरकरांचा फोटो लावल्याने तुम्हाला दु:ख झालं. सिद्धरामैय्या यांना विचारा मग विधानसभेत दाऊद इब्राहिमचा फोटो लावायचा आहे का? काँग्रेस लांगूलचालन करण्याचं राजकारण करत असते. तीच त्यांची समस्या आहे. त्यामुळेच देशाची ही अवस्था झाली आहे, असा हल्लाबोलही जोशी यांनी केला.काँग्रेसने सावरकरांच्या प्रतिमेचं अनावरण केल्याने त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्यावर राजकारण करू नये. राजकारण करण्याऐवजी सावरकरांच्या योगदानाचा सन्मान केला पाहिजे, असं भाजपने म्हटलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम