देशातर्गत विमान प्रवास महागला ; दुबई प्रवास स्वस्त !
दै. बातमीदार । २ जून २०२३ । प्रत्येक व्यक्तीला एकवेळा विमानात बसायचे स्वप्न असते. पण ते स्वप्न कधी सत्य होणार यावर कुणीही सांगू शकत नाही. तुम्हाला जर हे स्वप्न सत्य करायचं असेल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे आता मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटाचे किमान दर आता १९ हजार रुपयांवर पोहोचले असून तिकिटाचे हे दर मुंबई ते दुबईच्या तिकीट दरांंपेक्षा महागल्याचे चित्र आहे. दुबईच्या मार्गाचे तिकीट सध्या १४ हजार इतके आहे. दिल्लीच्या तिकिटापेक्षा हा दर पाच हजारांनी स्वस्त आहे. याच सोबत मुंबई, लेह, कोचीन, कोलकाता, चेन्नई या सर्वच शहरांकडे जाणाऱ्या विमानाच्या तिकिटांचे दर गगनाला भिडल्याचे दिसत आहे.
विमानाचे तिकीट किमान एक महिना आधी बुक केले तर कमी दरात मिळते असा आजवरचा ट्रेंड होता. मात्र, आता हा ट्रेंड हद्दपार झाला असून किमान एक महिना असो वा एक दिवस, तिकिटाच्या दरात फारसा फरक पडताना दिसत नाही. सध्या विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. ज्या प्रमाणात प्रवासी संख्या वाढली आहे त्या तुलनेत विमानांची संख्या अपुरी पडत आहे. परिणामी, मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे तिकिटांचे दर वाढताना दिसत आहेत. केंद्र सरकारने मे २०२० मध्ये (कोरोना काळात) विमानाच्या कमाल व किमान दरांची जी मर्यादा निश्चित केली होती. ती मर्यादा सप्टेंबर २०२२ मध्ये हटविली. याचा मोठा फायदा विमान कंपन्यांना झाला आणि त्या कंपन्यांनी वाढत्या मागणीच्या अनुषंगाने दर वाढविण्यास सुरुवात केली आहे.
त्यातच २ मे पासून गो-फर्स्ट कंपनीची विमाने जमिनीवर आहेत. या कंपनीची ५२ विमाने होती आणि देशाच्या विविध मार्गांवर ही विमाने २०० फेऱ्या करत होती. मात्र, आता ही विमाने जमिनीवरच असल्याने प्रवाशांना मर्यादित स्वरूपात विमान सेवा उपलब्ध झाल्या आहेत. त्याची परिणती देखील दरवाढ होण्याच्या रुपाने दिसून येत आहे. दरम्यान, वाढती प्रवासी संख्या लक्षात घेत इंडिगो विमान कंपनीने आपल्या फेऱ्यांच्या संख्येत १३ टक्के, एअर इंडियाने ९ टक्क्यांनी वाढ केली आहे. मात्र, तरीही हे अपुरे पडत आहे.
असे आहेत दर
मुंबई ते दिल्ली – १९,००० रुपये
मुंबई ते लेह – २२,५०० रुपये
मुंबई ते कोची – २०,००० रुपये
मुंबई ते दुबई – १४,००० रुपये
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम