मनसेतील गटबाजी चव्हाट्यावर ; नाशकात झळकले बॅनर !
दै. बातमीदार । २८ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील अनेक पक्षातील नेते मनसेला एक आमदार असलेला पक्ष म्हणून जरी हिणवत असले तरी मनसे काही प्रमाणात मोठ्या ताकदीने आपली संघटना बळकट करीत आहे पण मात्र नाशिक येथे मनसेमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिसू लागले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर आले आहे. दोन दिवसीय अमित ठाकरे यांचा हा दौरा असून प्रभागनिहाय आढावा घेतला जात आहे. याच दरम्यान अमित ठाकरे यांचे स्वागत केले जात असतांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले बॅनरवरुन राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले मनसेचे नेते डॉ. प्रदीप पवार यांचा फोटो बॅनरवर नसल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. जाणीवपूर्वक हा फोटो टाळला गेला की नजरचुकीने राहून गेला याबाबत मनसेच्या वर्तुळात बोललं जात आहे. डॉ. प्रदीप पवार यांचा फोटो नसल्याने मनसेच्या वर्तुळात चर्चा सुरू असतांना मनसेत गटबाजी आहे का ? जाणून बुजून फोटो लावला गेला नाही ? याशिवाय नजरचुकीने हा फोटो राहिला असावा असा तर्क लावला जात आहे.
खरंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातील व्यक्तींच्या यादीत डॉ. प्रदीप पवार यांचा समावेश आहे. राज ठाकरे यांनी 2014 च्या निवडणुकीत डॉ. प्रदीप पवार यांना उमेदवारी दिली होती. राज ठाकरे यांचा नाशिक दौरा असल्यावर डॉ. प्रदीप पवार यांना महत्वाचे स्थान असतं. मात्र, अमित ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान असलेल्या बॅनरवर डॉ. प्रदीप पवार यांचा फोटो नसल्याने उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम