नव्या वर्षातही नवीन भरती कमीच !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ जानेवारी २०२३ देशभरात मंदीचे संकट मोठ्या प्रमाणात होण्याचे संकेत मिळत असून, अनेक जागतिक कंपन्यांनी हजारोंच्या संख्येने कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, देशातही कर्मचारी भरतीवर परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. जानेवारी ते मार्च या तिमाहीत नवी कर्मचारी भरती करण्याबाबत कंपन्यांनी नकारात्मक संकेत दिले असून, या तिमाहीत नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण कमी होणार असल्याचे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

तीन हजार कंपन्यांच्या सर्वेक्षणातून तयार करण्यात आलेल्या मॅनपॉवर समूहाच्या अहवालानुसार, तब्बल १६ टक्के कंपन्यांनी नवे कर्मचारी घेण्याचे प्रमाण कमी करणार असल्याचे, तर ३४ टक्के कंपन्यांनी आहे ती कर्मचारी संख्या स्थिर ठेवणार असल्याचे म्हटले आहे. केवळ दोन टक्के कंपन्यांनी भरती करण्याबाबत काही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले.

जागतिक अस्थिर अर्थव्यवस्था आणि जागतिक मंदी यामुळे भारतीय कंपन्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांनी कर्मचारी भरतीबाबत सावध भूमिका घेतली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.नोकऱ्यांची उपलब्धता, नवी कर्मचारी भरती याबाबत भारत आशिया-प्रशांत क्षेत्रात ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीत असून, सिंगापूरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, असेही अहवालात म्हटले आहे. क्षेत्रनिहाय विचार केल्यास, रोजगार निर्मितीत आघाडीची क्षेत्रे असलेल्या माहिती तंत्रज्ञान, तांत्रिक, वित्त आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कर्मचारी भरतीचे प्रमाण प्रत्येकी ३९ टक्के आहे. तर ग्राहकोपयोगी वस्तू आणि सेवा क्षेत्रात हे प्रमाण ३७ टक्के असेल. वाहतूक, दळणवळण आणि वाहन क्षेत्रात सर्वांत कमी भरती होण्याचा अंदाज आहे. या क्षेत्रांमध्ये भरती होण्याची शक्यता केवळ २२ टक्के आहे. ऊर्जा, कच्चा माल उत्पादन आदी क्षेत्रांमध्ये हे प्रमाण ३३ टक्के आहे. तर आरोग्य सेवा आणि संबधित क्षेत्रांमध्ये भरतीची शक्यता ३२ टक्के आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम