नागपुरात फडणवीसांचे ध्वजारोहण ; मागेल त्याला शेततळे !
बातमीदार | १५ ऑगस्ट २०२३ | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण केले असून यावेळी त्यांनी राज्याच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सर्वसमान्यांना दिलासा मिळत असून राज्याचा विकास चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचं ते म्हणाले.
“प्रत्येक शेतकऱ्यांना एक रूपयामध्ये आपल्या सरकारने विमा दिला आणि अनेक शेतकऱ्यांनी या विम्याला प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील दीड कोटी शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. सध्या पावसाचे प्रमाण कमी आहे पण मला अशी आशा आहे की पाऊस अजून येईल. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.” असं ते म्हणाले. शेतकऱ्यांना ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही देतो, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला पेरणी यंत्र आणि अशा अनेक गोष्टी आम्ही मागेल त्या शेतकऱ्यांना देत आहोत. त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गतसुद्धा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या योजनेंचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांच्यामध्ये समृद्धी येईल. शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे, त्याला भाव मिळाला पाहिजे, त्याचबरोबर शेती व्यवसाय वाढीकडे सुद्धा आमचं लक्ष असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम