या कारणासाठी ‘शासन आपल्या दारी’ !
दै. बातमीदार । २६ मे २०२३ । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर दौरे करीत असतांना त्यांच्या हातून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविले जात आहे. येत्या १५ जूनपर्यंत किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देण्याचा सरकारचा मानस आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातसुद्धा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेला आहे.
‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे. एकाच ठिकाणी एका छताखाली नागरिकांना वेगवेगळे लाभ मिळावेत अशा रीतीने योजना करण्यात आली आहे. या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी आता महालाभार्थी पोर्टलमधून नागरिक स्वत: किंवा प्राधिकृत केंद्रावर माहिती भरूनसुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
एका जिल्ह्यात साधारणपणे ७५ हजार ते १ लाख नागरिकांची नोंदणी एक महिन्याच्या कालावधीत करण्यासाठी ४० ते ५० केंद्रे प्राधिकृत करण्यात आली आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश हा सरकारच्या योजना, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा हाच आहे. सरकारी निर्धारित शुल्कात २०० हून अधिक योजनांचा लाभ कमीतकमी कागदपत्रे सादर करून जलद मंजुरी मिळणार आहे. प्रशासन ‘हर घर दस्तक’च्या माध्यमातून प्रत्येकाला या योजनेची माहिती देणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना लाभ दिला जात आहे. येत्या १५ जूनपर्यंत हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविली जाणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम