राज्यातील १८ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज ; शेतकरी हैराण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ एप्रिल २०२३ ।  राज्यात उन्हाळा सुरु असतांना १८ जिल्ह्यात आज देखील अवकाळी पावसाचा अंदाज दिल्याने राज्यातील शेतकरी हैराण झाले आहे. येत्या २३ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. दरम्यान, शनिवारी १५ एप्रिल मालेगावमध्ये सर्वाधिक ४१.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. नाशकात पारा ३८. २ अंशावर होता.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सकाळी उन्हाचा कडाका तर सायंकाळनंतर गारपीट होत आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, जळगावसह मराठवाड्यातील परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव अशा एकूण १८ जिल्ह्यात २३ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज आहे. या आठवड्यात उन्हाचा कडाकाही कमी राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण भारतातील वारा खंडितता प्रणालीत बदल होत नाही, तोपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

मध्य भारतात दोन्ही बाजूला समुद्रसपाटीपासून साधारण ९०० मीटर उंचीपर्यंत हवेच्या उच्चदाबाची दोन क्षेत्रे तयार झाल्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोलाकार प्रत्यावर्ती चक्रीय वारे वाहत आहेत. महाराष्ट्राच्या भूभागावर पूर्व-पश्चिम असा मोठ्या रुंदीचा व ९०० मीटर उंचीपर्यंत दक्षिणोत्तर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.त्यामुळे सध्या महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये वारा खंडितता प्रणाली टिकून असून २३ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज आहे. शनिवारी नाशिकसह पनवेल, सातारा, धुळे, जळगाव, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस झाला. सिन्नर तालुक्यात सोनांबे, कोनांबे, सोनारी, जयप्रकाशनगर, डुबेरे, हरसूल, वडगाव- सिन्नर परिसरात गारपिटीमुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. सिन्नर शहरातही सुरुवातीला किरकोळ गारा पडल्या. तालुक्यात पंधरा दिवसात तिसऱ्यांदा गारपीट झाली आहे. डांगसौंदाणेसह परिसरात कांदा व भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतीचे बांध वाहून गेले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम