माजी आ.जाधव यांची BRS मध्ये प्रवेश ; दानवेना आव्हान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ मार्च २०२३ ।  राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संभाजीनगरातली शिवसेनेतली दुही विकोपाला गेली असतानाच आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात एक मोठी व धमाकेदार प्रवेश म्हणता येईल.

छत्रपती संभाजीनगरात आता BRS अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षाची एंट्री झाली आहे. विशेष म्हणजे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी BRS पक्षात प्रवेश केलाय. आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड मानली जातेय. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरेंविरोधात आव्हान उभं केलं होतं. आता हर्षवर्धन जाधव यांचा बीआरएसमधील प्रवेश ही भाजपाची डोकेदुखी ठरू शकते.नांदेडमधील ज्येष्ठ शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांच्या बीआरएस प्रवेशाच्या चर्चा सुरु असतानाच थेट संभाजीनगरातच हा पक्षप्रवेश झाल्याने मोठी राजकीय खळबळ माजली आहे.

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात नुकताच प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडल्याची माहिती समोर आली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी हैदराबाद येथे जाऊन भारत राष्ट्र समिती पक्षात केला प्रवेश केल्याचं वृत्त आहे. लवकरच चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजी नगर शहरात सभा घेणार असल्याचं सूतोवातही हर्षवर्धन जाधव यांनी केलंय. विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव यांना चंद्रशेखर राव यांच्या पक्षात राज्याची मोठी जबाबदारी देण्यात येणार अशी चर्चा आहे. जाधव यांच्यामार्फत पक्षाचा विस्तार केला जाऊ शकतो.

हर्षवर्धन जाधव नेहमीच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतात. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी संजना जाधव या भाजपचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजना जाधव गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांतून सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठी त्यांची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी हे आव्हान असल्याचं मानलं जातंय. बीआरएस हा भाजपविरोधी पक्ष आहे. हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्यामुळे चंद्रशेखर राव यांचं मोठं पाठबळ त्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कन्नड विधानसभा मतदार संघात रावसाहेब दानवे आणि भाजपसमोर हे मोठं आव्हान ठरू शकतं. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पक्ष संघटन वाढवण्याच्या उद्देशाने मराठवाड्यात पाय रोवतंय, हे यावरून स्पष्ट होतंय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम