
निवृत्त अधिकाऱ्याची ८० लाखांमध्ये फसवणूक
निवृत्त अधिकाऱ्याची ८० लाखांमध्ये फसवणूक
सायबर पोलिसांत गुन्हा
जळगाव प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील एक धक्कादायक सायबर फसवणूक समोर आली असून महावितरणचे ८६ वर्षीय निवृत्त अधिकारी सुखदेव चौधरी यांना आंतरराष्ट्रीय मनी लॉण्ड्रींग आणि अतिरेकी कारवायांचा खोटा आरोप लावून तब्बल ऐंशी लाखांनी लुबाडण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२७ ऑक्टोबर रोजी सुखदेव चौधरी यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून कॉल आला होता. . ‘डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया’ मधून बोलत असल्याचे सांगत कॉलरने प्रथम विश्वास संपादन केला. त्यानंतर लगेच व्हिडिओ कॉलवर स्वतःला मुंबई कुलाबा पोलिस ठाण्यातील अधिकारी विजय त्रिपाठी म्हणून ओळख देत चौधरी यांच्या नावावर गंभीर गुन्हे दाखल असल्याचा धाक दाखवण्यात आला. त्यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून अनेकांची फसवणूक केल्याचे सांगून गुन्हेगारी वातावरण तयार करण्यात आले.
यानंतर संजय पिसे नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने संपर्क साधून अंधेरी (पूर्व) येथील कॅनरा बँकेच्या खात्याचा वापर दहशतवादी संघटनांनी केल्याचा दावा करत बनावट दस्तऐवज व्हॉट्सअॅपवर पाठवले. आरोपींनी चौधरी यांना मानसिकदृष्ट्या अस्थिर करत हा प्रकार कुणालाही सांगू नये, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. यातच ‘न केलेल्या गुन्ह्याचा कबुलनामा’ लिहून घेऊन त्यावर खोटा ‘मुंबई पोलिस हेडक्वार्टर’ शिक्का मारून पाठवले.
दरम्यान ‘अब्दुल सलाम’ नावाचा आणखी एक संशयित समोर आला. आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्याने चौधरी यांना दर दोन तासांनी ‘बोथ आर सेफ जय हिंद’ असा संदेश पाठवण्याची सक्ती केली. पुढे दहशतवाद्यांसोबत छेडछाड केलेला फोटो दाखवत त्यांच्यावर अधिक दबाव टाकण्यात आला. चौधरी यांच्या खात्यात किती रक्कम आहे, अशी चौकशी करून त्यांच्याजवळ ८० लाख रुपये असल्याचे कळताच संपूर्ण रक्कम रिझर्व्ह बँकेकडे ‘पडताळणीसाठी’ जमा करावी लागेल, असा खोटा दम भरला. भीतीच्या वातावरणात चौधरी यांनी सलग तीन वेगवेगळ्या खात्यांमध्ये ८० लाख रुपये ट्रान्सफर केले.
यानंतरच आरोपींनी रिझर्व्ह बँकेचा बनावट शिक्का असलेले पत्र पाठवून विश्वास वाढवला. मात्र पैसे हस्तांतरित होताच सर्व आरोपी गायब झाले आणि फोनही बंद केले. शेवटी आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच सुखदेव चौधरी यांनी जळगाव सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित संशयितांचा शोध सुरू केला असून या प्रकरणाने भुसावळ परिसरात खळबळ उडाली आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम