गौतमीने केला मोठा खुलासा ; आई व तिच्यासोबत घडले होते असे काही !
दै. बातमीदार । १६ एप्रिल २०२३ । महाराष्ट्रात सध्या वाऱ्याच्या वेगात व्हायरल झालेली गौतमी पाटीलला आता कुणीही थांबवू शकत नाही अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. तिच्या नृत्यामुळे राज्याच्या राजकारणात सुद्धा वाद तापला होता. प्रत्येक गावागावात तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. कधीकधी गर्दी आवाक्याच्या बाहेर जाते आणि पोलिसांना मध्यस्थी करावी लागते. गौतमी अल्पावधीतच प्रसिद्ध झाली आहे. मात्र तिच्या खाजगी आयुष्याबाबत आजपर्यंत कोणालाच माहित नव्हतं. ऑड इंजिनिअर या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने आयुष्यातील स्ट्रगलचा खुलासा केला आहे.
गौतमीच्या वडिलांनी चांगली नोकरी, घर असल्याचं सांगून तिच्या आईसोबत लग्न केलं होतं. मात्र ते प्रचंड दारुडे निघाले. सतत त्यांचं दारु पिऊन येणं, मारहाण करणं सुरु झालं होतं. अशातच गौतमीची आई गरोदर राहिली. मात्र तरी तिच्या आईला मारहाण करणं काही बंद झालं नाही. एक दिवस गौतमीचे आजोबा लेकीला घरी घेऊन आले.
गौतमीच्या आईने माहेरीच गौतमीला जन्म दिला. आजोबांनीच गौतमी आणि तिच्या आईचा सांभाळ केला. तोपर्यंत गौतमीने कधीही आपल्या वडिलांचं तोंडदेखील पाहिलं नव्हतं. बहिणीचा संसार पुन्हा रुळावर यावा यासाठी गौतमीच्या मामांनी प्रयत्न केले. त्यांनी तिच्या वडिलांना बोलावून घेतलं. त्यावेळी गौतमी आठवीत होती. तिने पहिल्यांदा आठवीत असताना आपल्या वडिलांना पाहिलं होतं. यांना ओळखलं का असं तिला मामांनी विचारलं. तेव्हा ती नाही म्हणाली. परंतु मामा आणि आजोबांनी हे तुझे बाबा असल्याचं सांगत ओळख करुन दिली होती. हा प्रसंग मुलाखतीत सांगताना गौतमी भावूक झाली होती.
गौतमीने पुढे सांगितलं, ‘बाबा आमच्यासोबत राहायला तयार झाले. पण नंतर त्यांनी पुन्हा शिवीगाळ करणं, मारहाण करणं सुरु केलं होतं. ते काम करायचे नाहीत त्यामुळे पैसे नसायचे. घरी जेवायला अन्न नसायचं. त्यांचं घराकडे अजिबात लक्ष नव्हतं. त्यांच्या या वाईट वागणुकीला कंटाळून घर मालकानेसुद्धा आम्हाला एका रात्रीत खोली सोडायला करायला सांगितली होती. याकाळात आई छोटेमोठे काम करुन पन्नास रुपये मिळवत असे. पुढे आईचा अपघात झाला आणि ते पैसे पुरेनासे झाले. यानंतर मी आईच्या मैत्रिणीने सांगितलेल्या एका ओळखीतून डान्सच्या मार्गाला लागले.’
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम