मुलाच्या वाढदिवसानिमित्त बापाने ठेवला गौतमी पाटीलचा शो !
दै. बातमीदार । २५ फेब्रुवारी २०२३ । गेल्या काही वर्षापासून सोशल मिडीयावर खान्देश कन्या गौतमी पाटील मोठ्या प्रमाणावर आपल्या नृत्याने अवघ्या राज्याला वेड लावून ठेवले असतांना साताऱ्यात एका चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी थेट गौतमी पाटीलचा शो आयोजित केला होता. सातार्यातील खोजेवाडी गावातील 5 वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी ‘होऊ दे खर्च’ म्हणत चक्क गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम ठेवल्याने जिल्ह्यात या वाढदिवसाची जोरदार चर्चा आहे. हौसेला मोल नसते हेच खरे.
नृत्यातील अश्लिल हावभावामुळे दोन महिन्यांपूर्वी गौतमी पाटील विरोधात सातारा न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यानंतर तिचा साताऱ्यात झालेला हा दुसरा कार्यक्रम आहे. सातार्या जवळच्या खोजेवाडीसारख्या छोट्या गावात लावणी स्टार गौतमी पाटीलचा कार्यक्रम असल्याचे समजताच तरूणांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला गर्दी केली होती.
खोजेवाडीतील मल्हार शिंदे या पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडीलांनी हा कार्यक्रम ठेवला होता. ‘सबसे कातील, गौतमी पाटील’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतमीने आपल्या अदाकारीने चाहत्यांना घायाळ केले. गौतमीच्या कार्यक्रमामुळे मल्हार शिंदे या चिमुकल्याच्या वाढदिवसाची संपूर्ण सातारा जिल्ह्यात चर्चा आहे. सध्या लावणी म्हटले की सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर येते ते गौतमी पाटीलचे. गौतमीच्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. गौतमीची क्रेझ इतकी आहे की आता मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम सोडून प्रेक्षक गौतमीच्या कार्यक्रमाला गर्दी करतात. काही महिन्यांपूर्वी तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले. आणि तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तेव्हापासून यशाच्या शिखरावर असलेली गौतमी तिच्या एका शो साठी आता दीड ते दोन लाख रूपये घेते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम