भाविक भक्तांसाठी आनंदाची बातमी : २४ तास घेता येणार विठुरायाचे दर्शन !
बातमीदार | १६ नोव्हेबर २०२३
राज्यातील अनेक भाविक भक्त कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरात दर्शनासाठी येत असतात, याच भाविकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज दि.१६ नोव्हेबर सायंकाळपासून विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे. जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून रांगेत उभं राहण्याचा कालावधी कमी होणार आहे.
दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपूरमध्ये दाखल होत असतात. विठुरायाचे दर्शन मिळावे, यासाठी तासनतास वारकऱ्यांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. हीच बाब लक्षात घेता मंदिर समितीकडून विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू ठेवण्यात येते.
त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होते अशी प्रथा आहे. आज सायंकाळी देवाचा पलंग बाहेर काढला जाणार आहे. यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, कार्तिकी एकादशी ही २३ नोव्हेंबर रोजी होणार असून यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काही दिवसांपूर्वी तयारीचा आढावा घेतला. विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, भाविकांच्या निवासाचा ६५ एकर भक्ती सागर याची पाहणी केली. यावेळी त्यांनी दर्शन रांगेत कोणत्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम