जळगाव येथील माहितीचा अधिकार अधिनियमानुसार विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरीक माहिती विचारत असतात . काही कार्यालयांमध्ये नागरिकांना वेळेवर माहिती मिळत नाही व माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. जणू काही माहिती विचारणारा आपला वैरीच आहे अशा पद्धतीने जनमाहिती अधिकारी वागतात. त्यामुळेच माहिती अधिकार कार्यकर्ते व जनमाहिती अधिकारी, शासकीय अधिकारी यांच्यात मतभेद व वाद होत असतात. एकंदर जनमाहिती अधिकारी व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यात सख्य नसल्याचे चित्र बघायला मिळते . याउलट काही कार्यालयांमध्ये जनमाहिती अधिकारी विचारण्यात आलेली माहिती नागरीकांना कायद्यानुसार उपलब्ध करून देतात व नागरिकांशी सौजन्याने वागतात . काही कर्तव्यदक्ष व तत्परतेने माहिती उपलब्ध करुन देणाऱ्या अधिकाऱ्यांचा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे . अशाच काही जनमाहिती अधिकाऱ्यांचा आज जागतिक माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधुन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
सत्कार करण्यात आलेल्या जनमाहिती अधिकाऱ्यांमध्ये जिल्हा नियोजन विभागाचे श्री. सु. रा. बाविस्कर , सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. संजय पाटिल , उपविभागीय अधिकारी कार्यालयातील श्रीमती प्राजक्ता केदार , जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथील श्री. रवींद्र अमृतकर यांचा समावेश आहे . तसेच शासन परिपत्रकानुसार माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे उत्तमरीत्या नियोजन करून सदर कायद्याविषयी जनजागृती केल्याबद्दल जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती डॉ. विद्या गायकवाड यांचा देखील सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोल्हे, जिल्हा संघटक शैलेश सपकाळे, नरेंद्र सपकाळे, प्रचारक चंद्रकांत श्रावणे, दुर्वास कोळी, चंद्रशेखर कोळी, सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे, भीमराव सपकाळे, किरण ठाकूर आदि उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम