सरकारने घेतला ठाकरेंचा धसका ; धरपकड सुरु !
दै. बातमीदार । २१ जून २०२३ । राज्यातील सत्तेवर असलेल्या शिंदेंनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्यात गद्दार दिन पाळत गद्दारांना हिसका दिला. ‘पन्नास खोके, एकदम ओके’ अशा घोषणा देत शिवसैनिक रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांच्या संतापामुळे गद्दार मिंध्यांची पाचावर धारण बसली. हे आंदोलन चिरडण्याचे फर्मान मिंधे सरकारने काढले. राज्यभरात शिवसैनिकांची धरपकड करण्यात आली. शाखेत, घरांमध्ये घुसून पोलिसांनी शिवसैनिकांना अटक केली. प्रतिबंधात्मक नोटिसाही बजावण्यात आल्या. पोलिसांच्या या दडपशाहीचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून धिक्कार करण्यात आला.
मिंध्यांनी गेल्या वर्षी 20 जून रोजी गद्दारी केली होती. 40 गद्दार शिवसेना फोडून कमळाबाईला जाऊन मिळाले होते. या गद्दारीविरोधात महाराष्ट्रात तीव्र संताप असून आज गद्दार दिन पाळून मनातील चीड व्यक्त करण्यात आली. शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनेही आक्रमक होत गद्दारांचा निषेध नोंदवला. मुंबईसह राज्यभरात गद्दारांविरोधात आंदोलन करण्यात आले.
गिरगावच्या शाखेत घुसून दडपशाही करणाऱ्या पोलिसांचा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. महाराष्ट्रात रोजच्या रोज लोकशाहीची हत्या होत असल्याचे सारे जग पाहत आहे, असे नमूद करत आदित्य ठाकरे यांनी मिंध्यांवर तोफ डागली. आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या घरातून आणि कार्यालयातून ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचा वापर केला गेला. कारण काय? तर गद्दार गँगच्या मिंधे म्होरक्याला त्यांनी केलेल्या गद्दारी व भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन झाल्यास जनक्षोभाला सामोरं जावं लागेल आणि तोंड लपवावं लागेल याची भीती वाटते. मला प्रश्न पडलाय की, महाराष्ट्रात राजकीय विरोध करायला बंदी आहे का, असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम