राज्यातील या भागात गारपीटीचा इशारा !
दै. बातमीदार । १३ एप्रिल २०२३ । गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस सध्या तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. आज मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणात गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, उर्वरित राज्यातही विशेषत: मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राजस्थान आणि परिसरावर हे चक्राकार वारे सक्रीय आहेत. तर पूर्व विदर्भापासून, मराठवाडा, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. खंडित वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट)
दक्षिण कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड.
मध्य महाराष्ट्र : जळगाव, सांगली, सोलापूर,
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
दरम्यान, राज्यभरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच राजद्यात उन्हाचा चटकाही वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान चाळिशीपार गेले आहे. त्यामुळे दुपारी नागरिकांची उन्हाने लाही लाही होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय जळगाव, ब्रह्मपुरी येथे तापमान 41 अंशांपेक्षा अधिक होते. तर वर्धा, सोलापूर, परभणी, धुळे येथे पारा 40 अंशांच्या वर गेला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढले आहे. बहुतांश ठिकाणी तापमान 35 ते 39 अंशांच्या दरम्यान आहे.
देशभरात एक मार्च ते नऊ एप्रिल दरम्यान सर्वाधिक अवकाळी पाऊस महाराष्ट्रात झाल्याचे समोर आले आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली. त्यात देशभरातील एकूण पावसापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 80 टक्के इतर इतर ठिकाणी 28 टक्के पावसाची नोंद झाली. मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने तब्बल 1 लाख 73 हजार 893 हेक्टरवरच्या पिकाचे नुकसान झाल्याची भीती आहे. सध्याही अवकाळी पावसाचे थैमान सुरू असून, याचा जबर फटका आंबा पिकाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम