
जळगावातील हलव्याचे दागिने पोहोचले विदेशात !
अनघा डोहोळे यांनी कलाकृती करीत केले रवाना
दै. बातमीदार । १० जानेवारी २०२३ मकर संक्रांतीच्या तिळगुळाच्या गोडव्याबरोबर नवविवाहित महिला व लहान मुलांसाठी हलव्याचे दागिने परिधान करणे तितकेच आनंदाचे असते, ही संस्कृतीची जोपासना विदेशात गेल्यानंतर देखील कायम राखली जात आहे.
जळगाव येथील डोहोळे परिवारात गेल्या 70 वर्षांपासून स्व. उमा उपेंद्र डोहोळे यांच्यापासून त्यांची नातसून अनघा अजय डोहोळे या तिसऱ्या पिढीपर्यंत हाताने हलव्याचे दागिने तयार करण्याची परंपरा कायम आहे.
यंदा मुलुंड येथील सुनिता सतीश बिडवई यांनी आयर्लंड मध्ये वास्तव्यास असलेल्या नवविवाहित मुलगी आदिती अंकुर त्रिपाठी हिच्या संक्रांती सणासाठी अनघा डोहोळे यांनी तयार केलेले हलव्याचे दागिने घेऊन तिकडे पाठवले आहे.
सुनीता बिडवई यांचे आजोळ जळगावचे असल्यामुळे उमा डोहोळे या स्वतः हाताने 50 किलो पर्यंतचा हलवा बनवून महिला सहकारी मंडळास विकत देत असत आणि त्यांची मुलगी स्व.शालिनी पानट व नात मीनाक्षी कुलकर्णी या दोघी हलव्याचे दागिने तयार करीत असत याची त्यांना माहिती होती.
सोशल मीडियाच्या माध्यमातून डोहोळे परिवाराची तिसरी पिढी देखील ही परंपरा पुढे चालवीत असल्याची त्यांना माहिती मिळाली. बिडवई यांनी अनघा यांच्याशी संपर्क साधून विदेशात असलेल्या आपल्या मुलीसाठी मंगळसूत्र, राणीहार, तनमणी, बांगड्या, तोडे, ठुशी, कंबरपट्टा, बाजूबंद, नथ, झुबे, बिंदी आणि जावईंसाठी हलव्याचे दागिने मागणीप्रमाणे तयार करून घेतले. त्यांचा मुलगा आदित्य बिडवई यांच्या मदतीने काळजी घेत मायेच्या ममतेने पॅकिंग करीत कुरिअरद्वारे आयर्लंड येथे हे जळगावतील हलव्याचे दागिने पाठविण्यात आले आहे.
वारसा समृद्धीचा आनंद कलेची आवड असल्यामुळे सासरी आल्यानंतर हलव्याचे दागिने तयार करण्याचे मी स्वतः शिकून घेतले. गेल्या पाच वर्षांपासून मी ही परंपरा पुढे चालवीत आहे. आज मी तयार केलेले हलव्याचे दागिने विदेशात गेल्यामुळे माझ्या आजेसासूं पासूनचा परिश्रमाचा वारसा समृद्ध झाला आहे. त्याचा मला खूप आनंद होतो आहे अशी प्रतिक्रिया अनघा अजय डोहोळे यांनी व्यक्त केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम