दै. बातमीदार । १८ फेब्रुवारी २०२३ । आज महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. महादेवाच्या विशेष उपासनेसाठी महाशिवरात्रीची ख्याती आहे.
जीवनातील दुःख, अडचणी, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महादेवाची भक्तिभावाने उपसना केली जाते. हिंदू धर्मग्रंथानुसार ज्योतिर्लिंग स्तोत्रामध्ये बारा ज्योतिर्लिंगांची नावे, त्यांची स्थाने सांगण्यात आली आहेत.. पाहूयात 12 ज्योतिर्लिंगाबद्दल माहिती…
सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥
परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशंच शिवालये ॥३॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥
स्तोत्रानुसार 12 ज्योतिर्लिंग –
1. सोमनाथ (गुजरात -गीर सोमनाथ जिल्हा/वेरावळ)
2. मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश – श्रीशैल्य)
3. महांकालेश्वर (मध्यप्रदेश – उज्जैन)
4. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश – ओंकारेश्वर,खंडवा जिल्हा)
5. वैजनाथ (महाराष्ट्र – परळी, बीड जिल्हा)
6. भीमाशंकर (महाराष्ट्र – भीमाशंकर,खेड तालुका, पुणे जिल्हा)
7. रामेश्वर (तामिळनाडू – रामेश्वर,रामनाथपुरम जिल्हा)
8. नागनाथ (महाराष्ट्र – औंढा नागनाथ,हिंगोली जिल्हा)
9. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश – वाराणसी)
10. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र – त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा)
11. केदारनाथ (उत्तराखंड – केदारनाथ,रुद्रप्रयाग जिल्हा)
12. घृष्णेश्वर (महाराष्ट्र -वेरुळ,खुल्ताबाद तालुका, औरंगाबाद जिल्हा).
महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. तर भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि औरंगाबाद जिल्ह्यामधील खुलताबाद तालुक्यातील वेरुळ येथे ज्योतिर्लिंग मंदिर आहे. प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग (Grishneswar Jyotirlinga Temple) औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. याठिकाणी रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.
इतर ज्योतिर्लिंग
क्षय नाहीसा होण्याकरिता सोमाने (चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून सोमनाथ नावाने प्रसिद्ध झाले.
रागावून आलेल्या कार्तिकेयाला भेटण्याकरिता पार्वती व अर्जुन (शंकर) श्रीशैल्यपर्वतावर आले होते. त्यामुळे हे मंदिर मल्लिकार्जुन या नावाने ओळखले जाते.
या मंदिराला तीर्थक्षेत्रांमध्ये भगवान शिवचे सर्वात पवित्र निवासस्थान असे म्हटले जाते. हे मध्य प्रदेश राज्यात उज्जैन येथे आहे. रुद्र सागर तलावाच्या बाजूला हे मंदिर आहे. शिवलिंगाचे देव, भगवान शिव हे स्वयंभू आहेत असे समजले जाते.
ॐ या नावाचे लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे, हा सर्व भाग ॐकाराच्या आकाराचा आहे, म्हणून यास औकार अमलेश्वर अथवा ओंकारेश्वर म्हटले जाते.
रामेश्वर – दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. प्रभू रामचंद्रांने याची स्थापना केल्यामुळे यास रामेश्वर असे नाव पडले.
विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते.
हिमालयावर हरिद्वारहून केदार 240 किमी आहे. केदारनाथचे मंदिर वैशाष ते अश्विन उघडे असते. नंतर कार्तिकपासून चैत्रापर्यंत ते बर्फात असल्यामुळे बंद असते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम