तुरुंगातून सुटताच थेट राहुल गांधींची घेतली भेट ; झुकणार नाही !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ एप्रिल २०२३ । नुकतेच तुरुंगातून सुटलेल्या काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी गुरुवारी ६ एप्रिल पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. त्यांनी या भेटीचा एक फोटोही ट्वीट केला आहे, तसेच पंजाब आणि काँग्रेस नेत्यांबद्दलच्या त्यांच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला आहे.

“आज नवी दिल्लीत माझे मेंटर आणि मित्र राहुलजी, मार्गदर्शक प्रियंकाजी यांची भेट घेतली. तुम्ही मला तुरुंगात टाकू शकता, मला धमकावू शकता, माझी सर्व आर्थिक खाती ब्लॉक करू शकता, पण पंजाब आणि माझ्या नेत्यांबद्दल माझी वचनबद्धता झुकणार नाही किंवा एक इंचही मागे हटणार नाही,” असं ट्वीट सिद्धू यांनी केलंय.

गेल्या वर्षी १९ मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं नवज्योत सिंग सिद्धू यांना २७ डिसेंबर १९८८ च्या रोड रेज प्रकरणी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. पटियाला येथील शेरावले मार्केटजवळ कार पार्किंगवरून झालेल्या वादात सिद्धू यांच्यावर ६५ वर्षीय गुरनाम सिंग यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. यानंतर गुरनाम सिंग यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरनाम सिंग यांच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं गेलं. कनिष्ठ न्यायालय, नंतर उच्च न्यायालय आणि नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना दोषी ठरवल्यानंतर सिद्धू यांना सुमारे १० महिने पटियाला तुरुंगात काढावे लागले.

सिद्धू यांची १ एप्रिल रोजी तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सिद्धू पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ४ एप्रिल रोजी सिद्धू यांनी पंजाबच्या तुरुंगांची व्यवस्था आणि सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले. पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट आणण्याचे प्रयत्न सुरू असून अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप सिद्धू यांनी केला. यासोबतच त्यांनी घटनात्मक संस्था कमकुवत केल्याचा आरोप केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम